संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा ११ जून ला पंढरपूकडे प्रस्थान ठेवणार आहे. यावर्षी माऊलींचा रथ ओढण्याचा मान आळंदीमधील भोसले कुटुंबाच्या सर्जा- राजा बैलजोडीला मिळाला आहे. २००१, २०११ नंतर आता यावर्षी पुन्हा भोसले यांच्या बैलजोडीला हा मान तिसऱ्यांदा मिळाला आहे. रथ ओढण्यासाठी भोसले कुटुंबाने कर्नाटकमधून खिलार जातीची बैलजोडी विकत घेतली आहे अशी माहिती संतोष तुळशीराम भोसले यांनी दिली.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचा ११ जून रोजी पालखी सोहळा सुरू होत आहे. दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या सोहळ्याला वारकरी उपस्थित राहणार आहेत. लाखो वारकरी या सोहळ्याचा याची देही याची डोळा सोहळा अनुभवत असतात. यावर्षी माऊलींचा पालखी रथ ओढण्याचा मान भोसले कुटुंबाच्या सर्जा- राजा बैलजोडीला मिळाला आहे. कर्नाटकमधील राजापूर गावातून खिलार जातीची बैलजोडी भोसले कुटुंबाने साडेतीन लाखात विकत घेतली आहे. सध्या या बैलजोडीची निगा भोसले कुटुंब राखत आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून पिढ्यानपिढ्या भोसले कुटुंब हे माऊलींची सेवा करत आहे.
हेही वाचा… येरवड्यात १४ लाखांचे मेफेड्रोन जप्त
हेही वाचा… Maharashtra News Live : शरद पवारांनी ‘वारसदार’ टीकेवरून ठाकरे गटाला काय दिलं उत्तर?
“सर्जा- राजा बैलजोडीची निवड करत असताना बैलजोडी ही बलवान आणि संयमी आहे का? हे पाहिलं. बैल किमान दहा किलोमीटर चालायला हवेत. ते रथ, बैलगाडी ओढू शकतात असे निकष असलेली परिपूर्ण सर्जा – राजा बैलजोडी विकत घेतली आहे” अशी माहिती संतोष भोसले यांनी दिली आहे. ११ जून ला माऊलींचा पालखी सोहळा प्रस्थान ठेवणार आहे. त्याअगोदर बैलजोडीची अत्यंत काळजी घेतली जाते. पेंड, मका, गव्हाची कणिक त्यात गावरान तूप टाकून त्याचा खुराक बैलजोडीला दिला जातो. यावर्षीचा संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांचा १९२ वा पालखी सोहळा असणार आहे.