Pune Crime : कौटुंबिक वादातून पतीने पत्नीवर शिलाई मशीनच्या कात्रीने वार करुन तिची हत्या केली. बुधवारी पहाटे ही घटना पुण्यातल्या खराडी भागात घडली आहे. पतीने पत्नीची हत्या केली. त्यानंतर या संदर्भातला व्हिडीओही शूट केला आणि पती पोलीस ठाण्यात पोहचला. बुधवारी पहाटे खराडी भागात घडली. याप्रकरणी चंदननगर पोलिसंनी पतीला अटक केली. ज्योती शिवदास गिते (वय २८, रा. गल्ली क्रमांक ५, तुळजाभवानी नगर, खराडी) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी शिवदास तुकाराम गीते (वय ३७) याला अटक केली आहे. पत्नी आपली मालमत्ता हडप करेल असं त्याला वाटत होतं त्यामुळे त्याने ही हत्या केली. पोलिसांनी याबाबत माहिती दिली आहे.
पोलिसांनी नेमकं काय सांगितलं?
“आरोपी शिवदास तुकाराम गीते याने घरगुती कारणावरुन भांडण झाल्यामुळे आणि चारित्र्याच्या संशयावरुन शिलाई मशीनची कात्री मानेत खुपसून हत्या केली. चंदन नगर या ठिकाणी या प्रकरणात पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. या दोघांमध्ये कौटुंबिक वाद होता. आपली मालमत्ता पत्नी ज्योतीने हडप केली असा संशय शिवदासला होता. त्या संशयातून त्याने पत्नी ज्योतीची हत्या केली.” अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. आरोपीने गुन्हा केल्यानंतर एक व्हिडीओ त्याच्या कार्यालयीन कर्मचाऱ्यांच्या ग्रुपवर व्हिडीओ पोस्ट केला होता. त्यामध्ये त्याने काय केलं ते सांगितलं होतं. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल कोळपे करत आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
हत्या केल्यानंतर शिवदासने काय केलं?
पत्नी ज्योतीची हत्या केल्यानंतर तिचा पती शिवदासने साडेतीन मिनिटांचा एक व्हिडीओ तयार केला. तू घरातली लक्ष्मी होतीस पण तू मला फसवलं वगैरे वाक्यं या व्हिडीओत त्याने म्हटल्याचं समजतं आहे, तसंच दोघांमध्ये वाद झाल्याने शिवदासने पत्नी ज्योतीची हत्या केली. शिलाई मशीनची कात्री खुपसून मुलासमोरच पत्नी ज्योतीची शिवदासने हत्या केली. त्यानंतर साडेतीन मिनिटांचा व्हिडीओ तयार केला. पुण्यातल्या खराडी भागात ही धक्कादायक घटना घडली आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आणि काँग्रेस नेते रवींद्र धंगेकर यांनी या प्रकरणी गृहखात्याने कारवाई करावी अशी मागणी केली आहे. तसंच पुण्यात क्रौर्याला लाजवेल अशी घटना घडली आहे पोलिसांचा धाक उरलेला नाही अशी प्रतिक्रिया सुषमा अंधारेंनी दिली आहे.
ज्योती रक्ताच्या थारोळ्यात पडली होती अशी शेजाऱ्यांनी दिली माहिती
ज्योतीने केलेला आरडाओरडा ऐकून गाढ झोपेत असलेले शेजारी जागे झाले. शेजाऱ्यांनी कानोसा घेतला, तेव्हा ज्योती रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे आढळून आली. या घटनेची माहिती मिळताच चंदननगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी झालेल्या ज्योतीला तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.