पुण्याच्या दापोडीत पत्नीची हत्या करून फरार झालेल्या आरोपीला २७ वर्षांनी बेड्या ठोकण्यात पिंपरी- चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट १ ला यश आले आहे. १ फेब्रुवारी १९९५ ला रामा कांबळे ने पत्नी सुशिलाच्या चारित्र्यावर संशय घेऊन हत्या केली होती. त्यानंतर तो त्याच्या मूळ गावी न जाता पालापूर अक्कलकोट येथे पसार झाला होता. तब्बल २७ वर्ष तो नाव बदलून त्याच परिसरात वावरत होता. मिळेल ते काम करून पोट भरत होता. तिथं त्याने मूक बधिर तरुणीसोबत देखील विवाह केला होता. मात्र, तब्बल २७ वर्षांनी त्याला पोलिसांनी जेरबंद केलं. चित्रपटाला साजेशी अशी ही रामाची स्टोरी आहे. 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- Breaking: पुण्यातल्या जुन्या बाजारात दुकानांना भीषण आग; ८ दुकाने भस्मसात, जीवितहानी नाही!

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १ फेब्रुवारी १९९५ ला रामा कांबळेने पत्नी सुशीला ची चारित्र्यावर संशय घेऊन हत्या केली होती. रामा हत्या करून फरार झाला होता. तेव्हा त्याचे वय अवघे २७ वर्षे होते. पुणे पोलिस त्याचा शोध घेत होते. त्याच्या मूळ गावी कोळनूर पांढरी जि. उस्मानाबाद येथे पोलिस शोध घेत होते. परंतु, रामा पालापूर अक्कलकोट येथे नाव बदलून राहात, तिथं त्याने त्याचे नाव राम कोंडीबा बनसोडे असे सांगितले. तसे शासकीय कागदपत्रे ही त्याने बनवून घेतली. मिळेल ते काम करणाऱ्या रामावर तेथील गावकऱ्यांचा विश्वास बसला तो एकटाच असल्याने तेथील एका मूकबधिर तरुणीसोबत त्याचा विवाह लावून दिला. सर्व काही सुरळीत सुरू होत. रामा त्याच्या मूळ गावी कोळनूर जि.उस्मानाबाद येथे अधून- मधून आईसाठी येत असायचा. त्याने विवाह केल्याची कुणकुण गावातील व्यक्तींना होती. 

हेही वाचा- पुणे : पशुसंवर्धन विभागाकडून पदभरती प्रक्रिया रद्द

योगायोगाने काही दिवसांपूर्वी गुन्हे शाखा युनिट १ चे पोलीस विनयभंगाच्या आरोपीचा शोध घेण्यासाठी कोळनूर उस्मानाबाद येथे पोहचले. त्या आरोपीला पोलिसांनी बेड्या देखील ठोकल्या. दरम्यान, याच गावातील रामा कांबळे फरार आरोपी प्रकरणी पुन्हा चौकशी त्या गावात पोलिसांनी सुरू केली. रामा गावात अधून- मधून येत असल्याचे समोर आले आणि त्याने दुसरा विवाह केला असून तो पालापूर अक्कलकोट येथे राहतो अशी माहिती पोलिसांना मिळाली. रामा पोलिसांना गुंगारा देऊन गेली २७ वर्ष झाले मूक बधिर महिलेसोबत संसार करत होता. त्यांना तीन मुले देखील आहेत. तो काही महिने पालापूर आणि काही महिने पुण्याच्या उर्से मावळ परिसरात वीट भट्टीवर काम करत असे. त्याला गुन्हे शाखा युनिट १ ने उर्से मावळ मधून बेड्या ठोकल्या. २७ वर्ष पोलिसांना गुंगारा देणारा आरोपी रामा अखेर जेरबंद झाला आहे. गुन्हे पोलिस उपायुक्त स्वप्ना गोरे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी कानडे, मुल्ला, बोऱ्हाडे, कमले, हिरवळकर, मोरे, जायभाय, सरोदे, रुपनवर यांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे. 

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The husband who killed his wife in dapodi of pune was arrested after 27 years kjp dpj