पुणे स्मार्ट सिटी, देशात वास्तव्यास सर्वोत्तम शहर अशी बिरूदावली मिरविणाऱ्या पुण्यात मोकाट श्वानांचा उच्छाद वाढला आहे. मोकाट श्वानांची नसबंदी शस्त्रक्रिया होत नसल्याने संख्याही वाढत आहे. विशेष म्हणजे शहरात मोकाट श्वानांची संख्या किती आहे, याची ठोस आकडेवारी आरोग्य विभागाकडे नाही. तर महापालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या गावांमधील श्वानांची गणना झालेली नाही.दरम्यान, करोना संसर्गाच्या टाळेबंदीवेळी नसबंदीची प्रक्रिया ठप्प झाली होती. सध्या पाच संस्थांची त्यासाठी नियुक्ती करण्यात आली आहे, असा दावा महापालिका प्रशासनाकडून करण्यात आला आहे. टाळेबंदीच्या दोन वर्षांच्या काळात मोकाट श्वानांची संख्याही वाढली आहे. त्यामुळे मोकाट श्वानांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>>पुणे: लोहगाव विमानतळ परिसरात मोटारचालकाला लुटले

शहरातील मोकाट श्वानांचा प्रश्न गंभीर झाला आहे. रात्रीच्या वेळी मोकाट श्वान दुचाकीस्वारांच्या पाठीमागे लागत असल्याने अपघातांचा धोका वाढला आहे. मोकाट श्वानांनी चावा घेण्याचे प्रकरही वाढत आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात दरवर्षी कुत्र्यांनी चावा घेणाऱ्या नागरिकांची संख्या पंचवीस हजाराहून अधिक आहे. मात्र महापालिकेच्या उपाययोजना त्रोटक पडत असल्याने नागरिकांच्या त्रासात मोठी वाढ झाली आहे.दोन वर्षांपूर्वी करोना संसर्ग सुरू झाल्यानंतर मोकाट श्वानांची नसबंदी शस्त्रक्रियाही करण्याची प्रक्रियाही ठप्प झाली. मोकाट श्वानांचा प्रश्न शहरासाठी नवा नाही.महापालिकेच्या सर्वसाधारण सभेतही त्यासंदर्भात सातत्याने चर्चा करण्यात आली आहे. करोना काळापूर्वीही हा त्रास होता. मात्र टाळेबंदीनंतर तो मोठ्या प्रमाणावर वाढला. टाळेबंदीत नसबंदी शस्त्रक्रिया बंद होती. टाळेबंदीच्या काळात मुक्या प्राण्यांच्या दयेपोटी मोकाट श्वानांना खाऊ घालणाऱ्यांच्या संख्येतही वाढ झाली. त्यामुळे श्वानांची संख्या वाढली. श्वानांच्या झुंडीच्या झुंडी रस्त्यावर दिसून येऊ लागल्या आहेत.

हेही वाचा >>>पुण्याला वाढीव पाणी मिळणार का ?

आरोग्य विभागाकडील आकडेवारीनुसार पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात मिळून मोकाट श्वानांची संख्या साडेतीन लाखांपर्यंत आहे. मात्र ही संख्या त्यापेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे. पुणे महापालिकेने दरवर्षी ७५ हजार मोकाट श्वानांची नसबंदी शस्त्रक्रिया करण्याचे निश्चित केले होते. मात्र वर्षाला जेमतेम पंधरा ते वीस हजार शस्त्रक्रिया होत असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.टाळेबंदीच्या काळात नसबंदीची ठप्प झालेली प्रक्रिया फेब्रुवारी महिन्यापासून सुरू करण्यात आली. एकाच संस्थेला काम न देता शहराच्या पाच विभागात पाच संस्था नियुक्त करण्यात आल्या आहेत. या संस्थांना शस्त्रक्रिया करण्यासाठी सुविधा उभारणे, वाहनांची व्यवस्था करणे, औषधोपचार, ॲंटी रेबीज लसीकरण यासाठी खर्च करावा लागणार आहे. एका श्वानांची नसबंदीसाठी संस्थांना १ हजार ४०० रुपये देण्यात येणार आहेत. तर ज्या ठिकाणाहून श्वानाला ताब्यात घेतले आहे त्याच ठिकाणी सोडण्यासाठी २०० रुपये दिले जाणार आहेत. असा एकूण १ हजार ६०० रुपयांचा खर्च एका श्वानामागे महापालिका करणार आहे.

हेही वाचा >>>तब्बल ११ किलोमीटर उंचीच्या ढगामुळे पुण्यात विक्रमी पावसाची नोंद, आणखी एक ते दोन दिवस असणार पावसाची हजेरी

रामटेकडीत रुग्णालय
मोकाट श्वानांवर उपचार करण्यासाठी महापालिकेकडून रामटेकडी परिसरात रुग्णालय उभारण्यात येणार आहे. त्याबाबतच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे. रामटेकडी औद्योगिक परिसरातील फायनल प्लाॅट नं ५६ मधील ३ हजार २१७ चौरस मीटर मोकळ्या जागेत तीस वर्षांच्या कालावधीसाठी संयुक्त प्रकल्पाद्वारे रुग्णालयाची उभारणी करण्यात येणार आहे. दरम्यान, या प्रस्तावाला राष्ट्रवादी काँग्रेसने विरोध दर्शविला आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The incidence of stray dogs has increased in pune pune print news amy