पुणे : किशोरवयीन मुलांमध्ये असुरक्षित शारीरिक संबंधांचे वाढते प्रमाण चिंताजनक बनले आहे. अशा मुलांकडून कंडोमचा वापर २०१४ पासून २०२२ पर्यंत लक्षणीयरीत्या कमी झाला आहे. त्यातून किशोरवयीन मुलांमध्ये लैंगिक संक्रमित संसर्ग आणि अनियोजित गर्भधारणेचा धोका मोठ्या प्रमाणात वाढल्याचे वास्तव जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालातून समोर आले आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने शालेय मुलांच्या आरोग्य वर्तनाशी निगडित हे संशोधन प्रसिद्ध केले आहे. त्यात युरोपमधील ४२ देशांतील १५ वर्षांच्या वयोगटातील २ लाख ४२ हजार मुले आणि मुलींचे २०१४-२०२२ या कालावधीत सर्वेक्षण करण्यात आले. किशोरवयीन मुले असुरक्षित संबंध जास्त ठेवू लागल्याची बाब यातून अधोरेखित झाली आहे. त्यातून अनियोजित गर्भधारणा, असुरक्षित गर्भपात आणि लैंगिक संक्रमित संसर्गाचा धोका वाढला आहे. या मुलांचे वय पाहता या गोष्टींसाठी ते तयार नसल्याने त्याचे गंभीर परिणाम त्यांच्या भविष्यावर होत आहेत, असे अहवालात म्हटले आहे.

हेही वाचा…आता लोक स्वतःच्या मुलांच्या बाजूने उभे राहणार आणि यांना दणादण पाडून टाकणार : मनोज जरांगे पाटील

किशोरवयीन मुलांमध्ये २०१४ च्या तुलनेत २०२२ पर्यंत कंडोमचा वापर कमी झालेला आहे. सर्वच देशांमध्ये यात घट नोंदविण्यात आली असून, काही देशांमध्ये यात लक्षणीय घट झालेली आढळून आली आहे. कंडोमचा वापर करण्याचे प्रमाण २०१४ ते २०२२ या कालावधीत किशोरवयीन मुलांमध्ये ७० वरून ६१ टक्के आणि मुलींमध्ये ६३ वरून ५७ टक्क्यांवर घसरले आहे. दर तीनपैकी एका किशोरवयीन मुलाने शारीरिक संबंध ठेवताना कंडोम न वापरल्याची अथवा मुलीने गर्भनिरोधक गोळी घेतली नसल्याची बाब या अहवालातून स्पष्ट झाली आहे.

हेही वाचा…वनराज आंदेकर खून प्रकरणाचा मुख्य सूत्रधार सोमनाथ गायकवाड गजाआड; आंदेकर यांची बहीण आणि भाचाही अटकेत

अहवालातील ठळक मुद्दे

तीनपैकी एक मुलगा कंडोमचा वापर करीत नाही.
मुलांमध्ये कंडोमचा वापर करण्याचे प्रमाण ७० वरून ६१ टक्क्यांवर घसरले.
तीनपैकी एक मुलगी गर्भनिरोधक गोळी घेत नाही.
मुलींमध्ये गर्भनिरोधक गोळी घेण्याचे प्रमाण स्थिर आहे.

मुलींमध्ये कंडोमचा वापर करण्याचे प्रमाण ६३ वरून ५७ टक्क्यांवर घसरले.

शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये मुलांना लैंगिक शिक्षण देण्याची आवश्यकता आहे. याबाबत पालकांमध्येही जागरूकता निर्माण करायला हवी. मुलांना असुरक्षित शारीरिक संबंध, अनियोजित गर्भधारणा यांतील धोके समजावून सांगावे लागतील. मात्र, आपल्याकडे याला कायदेशीर मर्यादा आहेत. आपल्याकडील कायदे यासाठी सुसंगत नसल्याने मुलांना शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये लैंगिक शिक्षण देण्यात अडसर निर्माण होत आहे. डॉ.

भूषण शुक्ल, बालमानसोपचारतज्ज्ञ

हेही वाचा…Maharashtra News Live : “फोटोंना जोडे काय मारता, हिंमत असेल तर समोर या”, अजित पवारांच्या आव्हानावर राऊतांची प्रतिक्रिया; म्हणाले “मर्दानगीची भाषा…”

किशोरवयीन मुलांच्या समस्यांवर पालक आणि शिक्षक यांच्यात चर्चा व्हायला हवी. अनेकदा लैंगिक शिक्षणाबाबत मुलांसोबत चर्चा करण्यास पालकांमध्ये अवघडलेपण असते. शरीरशास्त्र, मासिक पाळी, वैयक्तिक स्वच्छता, लैंगिक कार्य, लिंगभेद याबाबत मुलांना योग्य माहिती देण्याची आवश्यकता आहे. त्याच वेळी मुलांना असुरक्षित शारीरिक संबंधांमुळे होणारे धोकेही समजावून सांगायला हवेत. डॉ. ज्योती शेट्टी, मानसोपचारतज्ज्ञ

Story img Loader