पुणे : पुणे मेट्रोच्या वनाज ते गरवारे महाविद्यालय या मार्गावरील सेवेला मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी दिलेल्या मंजुरीची माहिती देण्यास नकार देण्यात आला आहे. याबाबत पुण्यातील ज्येष्ठ अभियंते नारायण कोचक यांनी माहिती अधिकारांतर्गत केलेला अर्ज फेटाळण्यात आला आहे. त्रयस्थ संस्थेबाबत माहिती मागविली असून ती सार्वजनिक हितासाठी देता येत नसल्याचे कारण मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी यासाठी दिले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वनाज स्थानक ते गरवारे महाविद्यालय स्थानक या दरम्यान मेट्रो सेवा ६ मार्च २०२२ रोजी सुरू झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या सेवेला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. मेट्रोची सेवा सुरू करण्याआधी मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांची मंजुरी घ्यावी लागते. ही मंजुरी मिळाल्यानंतर प्रत्यक्ष त्या मार्गावर सेवा सुरू होते. याबाबत कोचक यांनी आयुक्तांच्या कार्यालयाकडे माहिती अधिकारांतर्गत २४ एप्रिलला अर्ज केला होता.

हेही वाचा – मुंबई-पुण्याची घरांच्या विक्रीत देशभरात आघाडी

आयुक्तांनी मेट्रोला दिलेल्या मंजुरीचा अहवाल माहिती अधिकारांतर्गत नारायण कोचक यांनी मागितला होता. मेट्रो सेवा सुरू करण्यास मंजुरी देताना आयुक्तांनी दिलेली सर्व प्रमाणपत्रे अथवा अहवाल यांच्या प्रतीही कोचक यांनी मागितल्या होत्या. याचबरोबर मेट्रो स्थानकांच्या संरचनात्मक स्थिरतेचा अहवालही त्यांनी माहिती अधिकारांतर्गत मागितला होता. आयुक्तांच्या कार्यालयाने कोचक यांना माहिती अधिकारांतर्गत ही माहिती नाकारली आहे.

माहिती नाकारण्यासाठी दिलेली कारणे

  • त्रयस्थ संस्थेबाबत माहिती मागविलेली आहे.
  • देशाची सुरक्षा, सामरिक, वैज्ञानिक आणि आर्थिक हिताला या माहितीमुळे बाधा येऊ शकते.
  • बौद्धिक संपदेसह व्यापाऱ्याचा गोपनीय करारांचा या माहितीमुळे भंग होऊ शकतो.
  • सार्वजनिक हितासाठी ही माहिती देता येणार नाही.

हेही वाचा – पुणे : दोन हजारांच्या नोटांमुळे पेट्रोल पंपचालकांची डोकेदुखी वाढली

सार्वजनिक हितासाठी मी माहिती मागविलेली होती. देशाच्या सुरक्षेचे कारण देऊन माहिती नाकारणे चुकीचे आहे. मेट्रोची सुरक्षा हा जनतेच्या सुरक्षिततेशी निगडित प्रश्न आहे. – नारायण कोचक, ज्येष्ठ अभियंता

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The information about the approval given to start the pune metro service was denied pune print news stj 05 ssb