पुणे : राज्यात पुढील चार दिवस पावसाचा जोर कमी राहणार आहे. किनारपट्टीसह पश्चिम घाटाच्या परिसरातही जोर कमी राहण्याचा अंदाज आहे. राज्याच्या उर्वरित भागात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात पुढील चार दिवस पावसाचा जोर काहीसा कमी राहण्याचा अंदाज आहे. हवामान विभागाने बुधवारसाठी (१० जुलै) किनारपट्टीवरील जिल्ह्यांसह पुणे, सातारा, विदर्भ आणि विदर्भाला जोडून असलेल्या मराठवाड्याला पिवळा इशारा दिला आहे. प्रामुख्याने सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

हेही वाचा >>>अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेतील दुसरी गुणवत्ता यादी उद्या… प्रवेश कधीपर्यंत घेता येणार?

हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ डॉ. अनुपम कश्यपी म्हणाले, सध्या अरबी समुद्रातील मोसमी पावसाची शाखा सक्रिय आहे. अरबी समुद्रातून बाष्पयुक्त हवा वेगाने किनारपट्टीकडे येत आहे. त्यामुळे किनारपट्टी आणि घाट परिसरात पावसाचा जोर राहील. पण, उर्वरित राज्यात पावसाचा जोर कमी होईल. गुरुवारपर्यंत (११ जुलै) पावसाचा जोर कमी राहील. त्यानंतर पावसाचा जोर हळूहळू वाढण्याचा अंदाज आहे.

राज्यात पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे. रविवार, सोमवारच्या तुलनेत किनारपट्टी आणि घाटमाथ्यावरही पावसाचा जोर कमी आहे. शुक्रवारनंतर (१२ जुलै) पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. मागील आठवडाभर गुजरातपासून केरळच्या किनारपट्टीवर असलेला कमी दाबाचा पट्टा अरबी समुद्रात आत गेल्यामुळे पावसाचा जोर कमी झाला आहे.- एस. डी. सानप, शास्त्रज्ञ, हवामान विभाग पुणे