राज्यात सध्या पुणे शहरात सर्वाधिक करोनाबाधित रुग्ण आढळत आहेत. या पार्श्वभूमीवर यंदाचा गणेशोत्सव आपण सर्वजण साध्या पद्धतीने साजरा करुयात जेणे करून करोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढणार नाही, असे आवाहन पोलीस सहआयुक्त रवींद्र शिसवे यांनी गणेशोत्सवानिमित्त आयोजित बैठकीत गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना केले. तसेच सर्व मंडळांना मी साष्टांग दंडवत घालून विनंती करतो की त्यांनी यंदाचा गणेशोत्सव रस्त्यावर नव्हे तर मंदिरातच साजरा करावा, असेही यावेळी शिसवे म्हणाले.

गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर आज पुणे महापालिकेत महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीला स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, सहपोलीस आयुक्त रवींद्र शिसवे, तसेच शहरातील गणेश मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी शिसवे म्हणाले, “शहरात दिवसेंदिवस करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. ही रुग्ण संख्या नियंत्रणात येण्याच्या दृष्टीने प्रशासन आणि सर्व संस्था रात्रंदिवस काम करीत आहेत. या करोनाच्या काळात आलेले सण-उत्सव आपण साध्या पद्धतीने साजरे केले आहेत. त्याचप्रमाणे आता गणेशोत्सवही साध्या पद्धतीने साजरा करावा. शहरात ज्या मंडळाची गणेश मंदिरं असतील त्यांनी तिथेच उत्सव साजरा करावा किंवा ज्यांची मंदिरे नसतील त्यांनी छोटासा मांडव उभारून हा उत्सव साजरा करावा. पण मी तुम्हाला साष्टांग दंडवत घालतो की, यंदाचा गणेशोत्सव मंदिरातच साजरा करू”

पुणे शहराने आजपर्यंत गणेशोत्सवाच्या माध्यमातून जगाला संदेश देण्याचे काम केले आहे. त्यामुळे यंदाच्या या महामारीत साध्यापणाने उत्सव साजरा करून आणखी एक संदेश देऊयात असे आवाहनही यावेळी सहपोलीस आयुक्त शिसवे यांनी उपस्थित मंडळांना केले.