आठ वर्षांच्या मुलावर अत्याचार करून खून केल्याच्या आरोपावरून चाकण पोलिसांनी अटक केलेला आरोपी खलतसिंह जनकसिंह पांचाळ (वय- , रा. उत्तर प्रदेश) याने दोन वर्षांपूर्वी हवेली तालुक्यातील नऱ्हे येथे आठ वर्षांच्या मुलीवर अत्याचार करून खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
चाकण येथील कडाची वाडी येथे राहणाऱ्या आठ वर्षांच्या मुलावर अत्याचार करून गळा दाबून खून केल्याच्या आरोपावरून चाकण पोलिसांनी खलतसिंग गुरुवारी अटक केली होती. पोलीस कोठडी मिळाल्यानंतर त्याची कसून चौकशी केली असता त्याने दुसरा खुनाचा गुन्हा उघडकीस आला. या संदर्भात हवेली पोलीस ठाण्यातील हवालदार रमेश पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, खलतसिंग हा नऱ्हे येथील एका बांधकाम साइटवर कामाला होता, त्याच कामावर शकिला इदमहंमद अन्सारी (मूळ रा. उत्तर प्रदेश) येथील मजूर महिला कामाला होती. २९ सप्टेंबर २०११ रोजी दुपारी शकिलाची मुलगी रुबीना ही खेळत असताना खाऊचे आमिष दाखवून बांधकामाशेजारील राहत्या घरात रुबीनाला नेऊन तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. ती ओरडू लागल्याने तिचा गळा दाबून खून केला. घरातील चादरमध्ये तिचा मृतदेह गुंडाळून तो फरार झाला होता. पोलीस त्याच्या मार्गावर होते मात्र तो मिळून येत नव्हता. चाकण पोलिसांकडे अटकेत असलेल्या खलतसिंहने चाकण पोलिसांना कबुली जबाबात रुबीनाचा खून केल्याचे सांगितले. चाकण पोलिसांच्या तपासानंतर खलतसिंगला ताब्यात घेणार असल्याचे पवार यांनी सांगितले. रुबीनाच्या खून प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक नामदेवराव कवठाळे व पवार हे करीत आहेत.