पुणे : कात्रज येथील राजीव गांधी प्राणिसंग्रहालयातून पसार झालेल्या बिबट्याचा अखेर दोन दिवसांनी शोध लागला. मंगळवारी रात्री नव्वानऊच्या सुमारास बिबट्याला पिंजऱ्यात कैद करण्यात आले. गेले दोन दिवस या बिबट्याच्या शोधासाठी अग्निशमन दल, पोलीस, महापालिका आणि वन विभागाचे १५० कर्मचारी, हायड्राॅलिक शिड्या, ड्रोन, थर्मल कॅमेरे अशी मोठी यंत्रणाला कामाला लावण्यात आली होती. अखेरीस बिबट्याला पकडण्यात आल्याने परिसरातील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला असून. या निमित्ताने महापालिकेच्या कारभारातील अनानोंदी उघडकीस आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कात्रज येथील राजीव गांधी प्राणिसंग्रहालयातून नर बिबट्या पिंजऱ्यातून पसार झाल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. त्यानंतर बिबट्या प्राणीसंग्रहालयाच्या आवारातच असून, बिबट्याला बेशुद्ध करून पिंजऱ्यात ठेवण्यात येईल, असा दावा महापालिकेकडून करण्यात आला होता. बिबट्याला शोधासाठी सोमवारी दुपारपासून प्राणीसंग्रहालय बंद ठेवण्यात आले आहे. हायड्रॉलिक शिड्या, ड्रोन, थर्मल कॅमेरे अशा साधनसामुग्रीचा वापर करून बिबट्याचा शोध सुरू करण्यात आला होता.

हेही वाचा >>>पुणेकरांना खुशखबर! मेट्रोची रामवाडीपर्यंत धाव

बिबट्याला पकडण्यासाठी प्राणिसंग्रहालयाच्या परिसरात १५ ते २० ठिकाणी सापळे (पिंजरे) लावण्यात आले होते. त्यात भक्ष्यही ठेवण्यात आले होते. पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका तसेच पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडील अग्निशामक दलाचे पथक, वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी, पोलीस अधिकारी, वनविभागाने अधिकृत मान्यता दिलेले वन्यजीव संरक्षक, प्राणिसंग्रहालयाचे अधिकारी आणि प्रशिक्षित मार्गदर्शक असे सुमारे १२० ते १५० जणांचे पथक कार्यान्वित करण्यात आले होते. प्राणिसंग्रहालयाच्या परिसरात असलेल्या सीसीटीव्हींबरोबरच काही ठिकाणी सीसीटीव्ही तातडीने बसवण्यात आले होते. अखेरीस मंगळवारी रात्री नव्वानऊच्या सुमारास बिबट्याला जेरबंद करण्यात यश आले.

गज वाकवून बिबट्या पसार?

प्राणिसंग्रहालयातून पसार झालेल्या साडेसात वर्षांच्या बिबट्याचे नाव सचिन आहे. त्याला कर्नाटकातील हंपी येथील अटलबिहारी वाजपेयी प्राणिसंग्रहालयातून दीड महिन्यांपूर्वी पुण्यात आणण्यात आले होते. पिंजऱ्याचे गज तोडून तो पसार झाल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. मात्र, पिंजऱ्याचे गज कसे वाकले, बिबट्या ठेवण्यात आलेला पिंजरा सदोष किंवा नादुरुस्त होता का, असे प्रश्न या निमित्ताने उपस्थित होण्यास सुरुवात झाली आहे. प्राणिसंग्रहालयातील कर्मचाऱ्यांचा निष्काळजीपणाही या निमित्ताने उघडकीस आला आहे.

बिबट्या पिंजऱ्यातून पळून जाण्यात मानवी चुका झाल्या आहेत का, याची सविस्तर चौकशी करून त्यात काही चुकीचे आढळल्यास कारवाई केली जाईल. तसेच प्रचलित नियमांनुसार प्राणिसंग्रहालयात आवश्यक त्या सुधारणा केल्या जातील.- विकास ढाकणे, अतिरिक्त आयुक्त, पुणे महापालिका

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The leopard that escaped from the rajiv gandhi zoo in katraj was finally arrested pune print news apk 13 amy
Show comments