पिंपरी: गवतावर जगणा-या प्राण्यांचे प्रमाण कमी झाल्याने डुक्कर, श्वानांच्या शिकारीसाठी बिबटे शहराकडे वळू लागले आहेत. चिखली परिसरात मोकळ्या जमिनी असून ज्वारी आहे. शिकार आणि पाण्याच्या शोधात बिबट्या चिखली परिसरात आल्याचा अंदाज वनरक्षक कृष्णा हाके यांनी व्यक्त केला. सध्या बिबट्या बावधन येथील वनविभागाच्या दवाख्यानात निगराणीखाली ठेवला आहे. दोन दिवसानंतर त्याच्या हालचाली पाहून मोठ्या जंगलात सोडण्यात येणार आहे. त्यामुळे तो परत शहरात येणार नाही, असेही ते म्हणाले.
चिखली-कुदळवाडी परिसरात मोठ्या गृहनिर्माण संस्था झाल्या आहेत. दाट लोकवस्तीचा हा परिसर आहे. बाजूला शेती आहे. गुरुवारी पहाटेच्या सुमारास बिबट्या देहू-आळंदी मार्गावरील कुदळवाडी परिसरात आढळला. परिसरातील भटक्या श्वानांनी भुंकून बिबट्याला जेरीस आणले. शेवटी जीव वाचवण्यासाठी बिबट्या इकडून तिकडे सैरावैरा पळू लागला. श्वानांच्या भीतीने बिबट्याने आश्रम रोड, चिखली येथील सुदाम मोरे यांच्या बंगल्याच्या कुंपणावरून उडी मारून आत प्रवेश केला. श्वानांच्या भुंकण्याच्या आवाजाने मोरे यांच्याकडील कामगार सकाळी साडेसहाच्या सुमारास बाहेर आला असता त्याला बिबट्याचे दर्शन झाले. याबाबत पोलिसांना आणि वनविभागाला माहिती दिली. दरम्यान बिबट्या आल्याची माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरली. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. बिबट्याला बघण्यासाठी घाबरलेल्या नागरिकांनी गर्दी केली होती. घरावर जाऊन नागरिक बिबट्याला पाहत होते.
हेही वाचा… चोरटे सुटाबुटात… खराडीत नामांकित वस्त्रदालनात ब्रँडेड कपडे, रोख पैशांची चोरी
वन विभागाचे एक पथक कुदळवाडीत दाखल झाले. वन विभागाकडून नागरिकांना खबरदारीच्या सूचना देण्यात आल्या. बिबट्या आणि मोरे कुटुंबियांची सहा जनावरे एकाच परसात होती. बिबट्याने एकाही जनावराला इजा केली नाही. एका बंगल्यातून दुसऱ्या बंगल्यात उड्या मारत बिबट्याने शेजारी असलेल्या शेतात धाव घेतली. ज्वारीच्या शेतात पसार झालेल्या बिबट्याला वन विभागाने दोन तासाच्या प्रयत्नानंतर पकडले. बिबट्याला पडकल्याने सुटकेचा श्वास सोडला. लोकवस्तीत बिबट्याने मुक्त संचार केल्याने नागरिकांमध्ये मात्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
जंगलतोड झाल्यामुळे प्राण्यांना राहायला जागाच उरली नाही. त्यामुळे प्राणी आता मानवी वस्तीत दाखल होत आहेत. जीव वाचवून जगण्याची धडपड ते प्राणी करीत आहेत. जंगल, नैसर्गिक अधिवास सुरक्षित केले पाहिजेत. – सुदाम मोरे