पुणे-मुंबई दरम्यान पुन्हा थेट विमानसेवा सुरू करण्यासाठी हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. प्रवाशांकडून याबाबत मागणी होत असल्याने लोहगाव विमानतळ प्रशासनाकडून याबाबत विविध विमान कंपन्यांशी बोलणी करण्यात येत आहे. ही सेवा सुरू झाल्यास पुणे ते मुंबई हा प्रवास ३० मिनिटांच्या आत पूर्ण होऊ शकणार आहे.

हेही वाचा- माऊलीचा पुन्हा एकदा स्वप्नभंग; चुरशीच्या लढतीत सिंकदर शेखकडून पराभव

पुणे विमानतळावरून पूर्वी पुणे-मुंबई दरम्यान थेट विमानसेवा होती. मात्र, ती बंद करण्यात आली. सध्या कोणत्याही विमान कंपनीकडून पुणे ते मुंबई दरम्यान थेट सेवा दिली जात नाही. सध्या विमानतळावरून देशांतर्गत विमानांची संख्या वाढली आहे. दिल्ली, बंगळुरू, हैदराबाद, कोलकता, नागपूर, अहमदाबाद, चेन्नई, गोवा अशा अनेक महत्त्वाच्या शहरांसाठी विमानसेवा सुरू आहे. आंतरराष्ट्रीय विमानसेवेलाही प्राधान्य देत सध्या लोहगाव विमानतळावरून दुबई, सिंगापूर आणि बँकॉक याठिकाणी थेट विमाने आहेत. पुण्याहून मुंबईला दररोज जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. या शहरांदरम्यान प्रामुख्याने पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरून प्रवास केला जातो. दोन्ही शहरांदरम्यान विमानसेवा सुरू करण्याची प्रवाशांची मागणी आहे. त्यानुसार सध्या विविध विमान कंपन्यांशी चर्चा करण्यात येत आहे.

हेही वाचा– नाराज कार्यकर्त्यांना संधी ! पुण्यात दहा स्वीकृत नगरसेवक होणार

पुणे-मुंबई दरम्यान थेट विमानसेवा सुरू झाल्यास २५ ते ३० मिनिटांमध्ये प्रवास करता येणार आहे. सध्या पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग आणि महामार्गावरूनच दोन्ही शहरातील प्रवाशांना प्रवास करावा लागतो. अनेकदा या मार्गांवर वाहतुकीची कोंडी होत असते. त्यातून प्रवासातच मोठा वेळ वाया जातो. मोटारीने मुंबईला जाण्याच्या खर्चा इतकाच विमानाच्या तिकिटाला खर्च येण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुणे-मुंबई दरम्यान थेट विमानसेवेचा पर्याय देण्याची मागणी गेल्या काही दिवसांपासून होत आहे.

हेही वाचा- निजामाबाद-पुणे, दौंड-भुसावळ रेल्वे गाड्या उद्यापासून रद्द; पुणे-नागपूर गाड्या बदललेल्या मार्गाने

पुणे-मुंबई शहरांदरम्यान थेट विमानसेवा सुरू करण्याबाबत सध्या विविध विमान कंपन्यांशी चर्चा केली जात आहे. प्रवाशांकडूनही त्याबाबत मागणी होत आहे. विमान कंपन्यांसह मुंबई विमानतळाकडे त्याबाबत कोणत्या वेळा उपलब्ध आहेत, याचीही माहिती घेतली जात आहे, अशी माहिती विमानतळ संचालक संतोष ढोके यांनी दिली.

Story img Loader