पुणे शहरामध्ये शुक्रवारी (२८ ऑक्टोबर) गेल्या चार वर्षांतील ऑक्टोबरमधील नीचांकी १३.८ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. २५ ऑक्टोबरलाही हेच तापमान नोंदविले गेले होते. यंदाच्या हंगामातीलही हे नीचांकी तापमान ठरले आहे. त्यामुळे रात्री आणि सकाळी थंडीचा कडाका वाढला आहे. दिवसाचे कमाल तापमानही अद्याप सरासरीखाली आहे. पुढील आठवडाभर थंडी कायम राहणार असली, तरी तापमानात किंचित वाढ होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा >>>पुणे : दिवाळीत सासूरवाडीला आलेला आंध्रप्रदेशातील चोरटा अटकेत
पुणे शहरासह संपूर्ण महाराष्ट्रातून २३ ऑक्टोबरला मोसमी पाऊस माघारी गेला. यंदा शहराला परतीच्या पावसाने चांगलेच झोडपून काढले. १ ऑक्टोबरपासून शहरात सुमारे ३५० मिलिमीटर आणि सरासरीपेक्षा तब्बल २०० मिलिमीटर अधिक पावसाची नोंद झाली. शहरात पावसाळी वातावरण असताना २२ ऑक्टोबरपर्यंत किमान तापमान २२ अंश सेल्सिअसच्या वर नोंदविले जात होते. मात्र, पाऊस परतल्यानंतर आकाशाची स्थिती निरभ्र झाली आणि शहराच्या तापमानात एकदमच ६ अंशांनी घट होऊन ते १५.८ अंशांवर गेले. त्यामुळे दिवाळीत पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि जिल्ह्यातही थंडी अवतरली. त्यानंतर तापमानातील ही घट कायम राहिली.
हेही वाचा >>>पुणे : ऑनलाइन पीएच.डी.ला मान्यता नाही ; युजीसीकडून स्पष्ट इशारा
शहरात २४ ऑक्टोबरला १४.४ अंश सेल्सिअस, तर २५ ऑक्टोबरला यंदाच्या हंगामातील नीचांकी १३.८ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. २६ आणि २७ ऑक्टोबरला १४.३ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदविले गेले. शुक्रवारीही (२८ ऑक्टोबर) शहरात पुन्हा १३.८ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. तीन दिवसांच्या अंतराने नोंदविलेले हे समान तापमान हंगामातील आणि गेल्या चार वर्षांतील नीचांकी तापमान ठरले आहे. पुणे वेधशाळेने दिलेल्या अंदाजानुसार, पुढील आठवडाभर थंडीची स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. या काळात तापमानात काही प्रमाणात वाढ होऊन ते १५ अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे. दिवसाचे कमाल तापमान ३० ते ३१ अंशांवर राहण्याची शक्यता आहे.
हेही वाचा >>>पुणे : घरात डोकावून पाहिल्याने जाब विचारणाऱ्या एकाला मारहाण
दहा वर्षांतील किमान तापमान
पुणे शहरामध्ये गेल्या दहा वर्षांमध्ये ऑक्टोबरमध्ये दोनदा किमान तापमानाचा पारा १२ अंशांपर्यंत खाली आला आहे. २०१० मध्ये ३० ऑक्टोबरला १२.० अंश, तर २०१२ मध्येही ३० ऑक्टोबरलाच किमान तापमान १२.७ अंशांपर्यंत घसरले होते. मात्र, गेल्या चार वर्षांत तापमान १४ अंशांच्या खाली येऊ शकले नव्हते. ऑक्टोबर २०१९ मध्ये १८.२, २०२० मध्ये १५.२, तर २०२१ मध्ये १४.४ अंश नीचांकी तापमानाची नोंद झाली होती. मात्र, यंदा २५ आणि २८ ऑक्टोबरला तापमानाचा पारा १३.८ अंशांपर्यंत खाली आला.