पुणे : विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य निवासी डॉक्टर संघटनेने (मार्ड) बुधवारपासून बेमुदत संपांचा इशारा दिला आहे. पुण्यातील बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातील ४५० निवासी डॉक्टर या संपामध्ये सहभागी होणार आहेत. त्यामुळे ससून सर्वोपचार रुग्णालयातील रुग्णसेवा विस्कळीत होण्याची शक्यता आहे.
राज्यातील सर्व सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांतील निवासी डॉक्टर संपामध्ये सहभागी होणार आहेत. हा संप बुधवारी सायंकाळी पाच वाजल्यापासून सुरू होणार आहे. निवासी डॉक्टरांनी विविध मागण्यांसाठी गेल्या वर्षी जानेवारीमध्ये संप केला होता. त्या वेळी राज्य सरकारने मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्याने संप मागे घेण्यात आला. मात्र, आश्वासन देऊन एक वर्ष उलटले, तरी सरकारकडून निर्णय घेतला जात नसल्याने पुन्हा संप पुकारण्यात आला आहे. या संपामुळे ससूनमधील बाह्यरुग्ण विभागातील रुग्णसेवेला सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता आहे.
हेही वाचा >>>पुणे : कोयना धरणात सुरू होणार वॉटर स्पोर्टस
विद्यार्थ्यांची संख्या वाढल्याने वैद्यकीय महाविद्यालयामधील वसतिगृहांमधील जागा अपुरी पडत आहे. निवासी डॉक्टरांचे विद्यावेतन अनेक महिने प्रलंबित राहते. अनेकदा ते वेळेवर मिळत नाही. वसतिगृहांची संख्या वाढविण्यात यावी, विद्यावेतन प्रत्येक महिन्याच्या १० तारखेपर्यंत निवासी डॉक्टरांच्या खात्यात जमा व्हावे. केंद्र सरकारच्या संस्थांप्रमाणे विद्यावेतनात वाढ करावी, अशा निवासी डॉक्टरांच्या मागण्या आहेत.
निवासी डॉक्टरांच्या विविध मागण्या सरकारने आश्वासन देऊनही पूर्ण केलेल्या नाहीत. त्यामुळे हा संप पुकारण्यात आला आहे. संपाच्या कालावधीत आम्ही बाह्यरुग्ण विभागात सेवा देणार नाही. मात्र, रुग्णालयातील सर्व आपत्कालीन सेवा सुरू राहतील.- डॉ. निखिल गट्टानी, अध्यक्ष, बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय मार्ड