कार्ला येथे इंग्रज आणि मराठ्यांमध्ये ४ जानेवारी १७७९ मध्ये झालेल्या लढाईत इंग्रजांचा पराभव झाला होता. इंग्रज सेनापती स्टुअर्ट फाकड्डा या लढाईत मारला गेल्याची नोंद इतिहासात आहे. या सर्व घटनांची नोंद इंग्लंडच्या दप्तरीही आहे. त्याचीच प्रत्यक्ष भेटीत माहिती घेण्यासाठी इंग्लड येथील शिष्टमंडळाने ऐतिहासिक कार्ला नगरीला भेट दिली. त्यावेळी लढाईच्या घटनेला उजडाळा मिळाला.
हेही वाचा >>> पुणे : जिल्ह्यातील २२१ ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया सुरू
इंग्रज आणि मराठा सैनिकांमध्ये कार्ला येथे झालेल्या लढाईत मारला गेलेल्या स्टुअर्ड फाकड्डाचा एक स्तंभ कार्ला येथे आहे. इंग्लड येथील पंधरा जणांच्या शिष्टमंडळाने कार्ला परिसराला भेट देऊन या ऐतिहासिक घटनेविषयीची माहिती घेतली. इतिहासाचे अभ्यासक नितीन शास्त्री यांनी शिष्टमंडळाला याबाबतची माहिती दिली. इंग्रजांबरोबर झालेली सर्वात मोठी लढाई आणि त्यात मराठा सैनिकांनी मिळविलेला सर्वात मोठा विजय कायम स्मरणात रहावा, यासाठी संबंधित ठिकाणी उभा राहत असलेल्या विजयस्तंभाविषयीची माहितीही शास्त्री यांनी शिष्टमंडळाला दिली.
हेही वाचा >>> पुणे : अभियांत्रिकी पदविका प्रवेशांत वाढ; सर्वाधिक प्रवेश अमरावती विभागात
इंग्लडमधील अभ्यासकांच्या या शिष्टमंडळात इंग्लडच्या सैन्यातील निवृत्त कर्नल पॅट्रीक्स यांचाही समावेश होता. कार्ला ग्रामपंचायतीचे माजी सदस्य भाऊसाहेब हुलावळे यांनी शिष्टमंडळाचे स्वागत केले. या ऐतिहासिक स्थळावर दरवर्षी मराठा सैनिकांच्या विजयाची आठवण म्हणून विजयदिन साजरा केला जात असल्याचेही त्यांनी शिष्टमंडळाला सांगितले.