राज्य आणि केंद्र यांच्यात सुरू असलेल्या संघर्षावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केले आहे. अवघ जग करोना संकटाचा मुकाबला करत आहे. अशावेळी आपला देश आणि देशातील जनता एकसंघ होऊन, करोना संकटाशी सामना करत असल्याचा संदेश जाण्याची गरज आहे, असे त्यांनी म्हटले. तसेच, आज होणाऱ्या आषाढी वारीच्या बैठकीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी फोनद्वारे बोलणं झाल्याचंही त्यांनी सांगितले. पिंपरी-चिंचवडमध्ये एका उड्डाण पुलाच्या उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी आगामी काळातील लॉकाडउन बाबत बोलतान उपमुख्यमंत्री म्हणाले की, लॉकडाउन संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी काय निर्णय घेतात, ते आपल्याला ऐकायला मिळेलच. पण माझा अंदाज आहे की, वेगवेगळ्या राज्यांवर ती जबाबदारी सोडण्याची शक्यता आहे.
जगाने या संकटाचा मुकाबला करायचं ठरवलेलं आहे. अशावेळी आपला देश आणि जनता एकसंघ होऊन संकटाचा सामना करत असल्याचं चित्र समाजात जाण्याची गरज आहे. त्यामुळे आम्ही आमच्या परीने जेवढ्या काही रेल्वे मागवून घेता येतील आणि पाठवता येतील त्याचा प्रयत्न केलेला आहे, आज ही ते काम सुरू आहे. आम्हाला एवढंच आवाहन करायचं आहे की, कुणी गावी जाताना, परराज्यात किंवा इतर जिल्ह्यात चालत जायचा प्रयत्न करू नये. त्याच्यासाठी एसटी बस उपलब्ध करून दिल्या आहेत. केंद्र सरकारच्या मदतीने रेल्वे उपलब्ध करून दिलेली आहे. ज्यांना परराज्यात जायचं आहे त्यांना मूभा देखील आहे. फक्त नियमांचं काटेकोर पालन केले पाहिजे. मास्कचा वापर व सोशल डिस्टसिंग नागरिकांनी पाळले पाहिजे.
आषाढी वारीच्या निर्णयासाठी बैठक –
आषाढी वारी निमित्त १५ दिवसांपूर्वी बैठक झाली. त्याच वेळेसच २९ मे रोजी निर्णय घेऊ असं सांगण्यात आलं होतं . संपूर्ण महाराष्ट्रात करोनाचं कितपत संकट आहे, त्याचा प्रसार किती झाला आहे हे पाहूण पुढील निर्णय घेणार आहोत. अनेकांनी आपापल्या परीने उपाय सुचवले होते. या विषयी आज मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालेलं आहे. मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांशी बोलणं झालेलं आहे. त्यांचं मत जाणून घेतलेले आहे. आज तीन वाजेच्या सुमारास आषाढी वारी संबंधी बैठक आहे. भावनेचा प्रश्न आहे, वर्षानुवर्षे आणि पिढ्यानपिढ्या आषाढी, कार्तिकी वारी जाताना पाहिलेली आहे, पूर्वीचा इतिहास देखील आहे. लोकांच्या भावनाही जपल्या गेल्या पाहिजेत, कोणालाही वाईट वाटता काम नये, परंतु, हे जे संकट आहे याची नोंद घेऊन, त्याबद्दल कशी आखणी करायची? हे आज होणाऱ्या बैठकीत चर्चेनंतर ठरणार आहे.