पुणे : गेल्या काही दिवसांत तापमानात सातत्याने घट होत असल्याने शहर आणि परिसरात हुडहुडी भरवणारी थंडी जाणवत होती. मात्र, ‘फेंगल’ चक्रीवादळामुळे आता थंडीचा जोर कमी होऊन आता तापमान वाढण्यासह आकाळ ढगाळ झाले आहे. ढगाळ आकाशाची स्थिती आणखी काही दिवस राहणार असून, हलक्या स्वरुपाच्या पावसाचा अंदाजही हवामान विभागाने वर्तवला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हवेतील कमी झालेली आर्द्रता, कोरडे झालेले वातावरण, उत्तरेकडून येणारे वारे अशा कारणांमुळे शहर आणि परिसरात गारवा वाढला होता. तसेच किमान तापमानात घट होत राहिल्याने थंडीचा जोर वाढत गेला होता. शहरातील पाषाण, शिवाजीनगर अशा काही ठिकाणी ८-९ अंश सेल्सियसपर्यंत तापमान कमी झाले होते. मात्र बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या फेंगल चक्रीवादळामुळे वातावरणात बदल होऊन थंडीचा जोर कमी झाला आहे. हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार पुण्यात रविवारी  १३.३ अंश सेल्सियस, तर सोमवारी १७.४ अंश सेल्सियस तापमान नोंदवले गेले आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांत शहरातील तापमान ७ अंश सेल्सियसने वाढल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा >>>जेजुरीच्या खंडोबा गडावर शंकराचार्यांच्या हस्ते घटस्थापना; चंपाषष्ठी उत्सवास प्रारंभ

 ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ अनुपम कश्यपी म्हणाले, की फेंगल चक्रीवादळामुळे हवेतील आर्द्रता वाढली आहे. तसेच किमान तापमानात वाढ झाल्यामु‌ळे थंडी कमी झाली आहे. ही स्थिती आणखी दोन-तीन दिवस राहू शकते. त्यानंतर पुन्हा तापमानात घट होऊन थंडी पडू शकेल.  

दरम्यान, हवामान विभागाने ८ डिसेंबरपर्यंत आकाश ढगाळ राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. तसेच ५ आणि ६ डिसेंबर रोजी हलक्या ते अतिहलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे नमूद केले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The meteorological department has predicted rain in pune city pune print news ccp 14 amy