पुणे : ‘विविधतेतील एकात्मकते’चे दर्शन घडवून मंजुश्री ओक यांनी भारतातील तब्बल १२१ भाषा, बोलीभाषा आणि उपभाषांमध्ये सलग साडेतेरा तास १२१ गाण्यांचे सादरीकरण केलेल्या विक्रमाची ‘ गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्’मध्ये नोंद झाली आहे.  या विक्रमासाठी त्यांनी यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे १० ऑक्टोबर, २०१९ रोजी झालेल्या ‘अमृतवाणी-अनेकता मैं एकता’ या कार्यक्रमात ही गीते सादर केली होती. गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस् यांच्याकडून हा विक्रम पूर्ण झाल्याचे त्यांना नुकतेच कळविण्यात आले आहे.

हेही वाचा >>> पुण्यातील नाट्यगृहांच्या दुरवस्थेची चंद्रकांत पाटील यांनी घेतली अखेर दखल; म्हणाले ‘पुणेकर आणि नाट्यकलावंतांच्या सूचना…’

यापूर्वी ओक यांनी २०१७ आणि २०१८ अशी सलग दोन वर्षे ‘इंडिया बुक ऑफ रेकोर्डस्’ आणि ‘एशिया बुक ऑफ रेकॉर्डस्’मध्ये प्रत्येकी दोन विक्रम नोंदविले आहेत. ओक म्हणाल्या, शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेत असताना आपल्या संगीत क्षेत्रातील प्रयत्नांद्वारे देशासाठी काहीतरी योगदान द्यावे, हा विचार मनात होता. याच दृष्टीने श्री यशलक्ष्मी आर्ट आणि पद्मनाभ ठकार यांच्या विशेष सहकार्याने ‘अमृतवाणी-अनेकता मैं एकता’ हा कार्यक्रम केला. वीस मैलांवर जशी भाषा बदलते. तसा भारताचा विचार केल्यास भाषेमधील वैविध्य प्रकर्षाने समोर आले. भारतात १८०० हून अधिक भाषा, बोलीभाषा, उपभाषा बोलल्या जातात. या सर्व भाषांवर त्या त्या भागांतील संस्कृती, संगीत, परंपरा, भौगोलिक, सामाजिक परिस्थिती यांचा ठळकपणे प्रभाव दिसून येतो. देशातील ही विविधता भाषा आणि गाण्यांच्या स्वरूपात जगापर्यंत पोहोचावी या उद्देशाने मी हा विक्रम करण्याचा केलेला प्रयत्न यशस्वी ठरला.

Story img Loader