पुणे : टेम्पोने धडक दिल्याने मृत्यू झालेल्या व्यावसायिकाच्या कुटुंबीयांना ५८ लाख ५२ हजार ६७३ रुपये देण्याचे आदेश मोटार अपघात न्यायप्राधिकरणाने विमा कंपनीला दिला आहे. न्यायप्राधिकरणाचे सदस्य न्यायाधीश एस. बी. हेडाऊ यांनी याबाबतचा निकाल दिला.अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यावसायिकाची पत्नी, तीन मुले आणि आई यांनी ॲड. एन. डी. वाशिंबेकर आणि ॲड. जे. के. बसाळे यांच्यामार्फत शिवाजीनगर मोटार अपघात न्यायप्राधिकरण येथे दावा दाखल केला होता. दावा दाखल केल्याच्या दिनांकापासून दी न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीने वार्षिक सात टक्के व्याजाने व्यावसायिकाच्या कुटुंबीयांना ५८ लाख ५२ हजार ६७३ रक्कम नुकसान भरपाईपोटी देण्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
४२ वर्षीय व्यावसायिक २२ मे २०१७ रोजी पुणे-नगर रस्त्यावरुन निघाले होते. त्या वेळी रस्ता ओलांणाऱ्या व्यावसायिकाला भरधाव टेम्पोने धडक दिली. गंभीर जखमी झालेल्या व्यावसायिकाला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान २८ मे रोजी २०१७ त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर जून २०१७ मध्ये नुकसान भरपाई मिळावी, यासाठी व्यावसायिकाच्या कुटुंबीयांनी दावा दाखल केला होता. मृत्यू झालेल्या व्यावसायिकाचा टुर्स अँड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय होता.
हेही वाचा >>>अबब! देशातील अतिश्रीमंतांची संख्या पाच वर्षांत ‘एवढी’ वाढणार
त्यांचे वार्षिक उत्पन्न पाच लाख २५ हजार ९८८ रुपये होते. उत्पन्न, वय आणि अवलंबून असलेल्या व्यक्तींचा विचार करून अधिकाधिक नुकसान भरपाई देण्याची मागणी ॲड. वाशिंबेकर आणि ॲड. बसाळे यांनी केली होती. न्यायालयाने कुटुंबीयांची मागणी ग्राह्य धरुन व्यावसायिकाच्या कुटुंबीयांना दावा दाखल केल्याच्या दिनांकापासून वार्षिक सात टक्के व्याजदराने ५८ लाख ५२ हजार ६७३ रक्कम नुकसान भरपाईपोटी देण्याचे आदेश दिले.