पुणे : पुणे-मुंबई रस्त्यावरील बोपोडी भागात रात्रपाळीत गस्त घालणाऱ्या पोलीस हवालदाराला चिरडणाऱ्या मोटारचालक सिद्धार्थ उर्फ गोट्या केंगार याने मद्यप्राशन केल्याचे निष्पण्ण झाले आहे. विश्रांतवाडीतील धानोरी भागात वाढदिवसाच्या पार्टीत मद्यप्राशन करून जाताना हा अपघात झाला. पोलिसांनी केंगार याच्या दोन मित्रांना अटक केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

खडकी पोलीस ठाण्यात नियुक्तीस असलेले पोलीस हवालदार समाधान आनंदराव कोळी (वय ४४, सध्या रा. बोपोडी, मूळ रा. जळगाव) आणि सहकारी पोलीस कर्मचारी संजोग श्याम शिंदे (वय ३५) रविवारी मध्यरात्री बोपोडी भागात गस्त घालत होते. भुयारी मार्गाजवळ भरधाव मोटारीने दुचाकीला पाठीमागून धडक दिली. अपघातात दुचाकीस्वार शिंदे आणि कोळी जखमी झाले. मोटारीच्या चाकाखाली सापडून कोळी यांचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाल्याचे उघडकीस आल्यानंतर पोलीस दलात खळबळ उडाली.अपघातानंतर पसार झालेला मोटारचालक केंगार (वय २४, रा. बोपोडी) याला अटक करण्यात आली आहे. केंगार अपघात करून घरी जाऊन झोपला होता. त्याने मोटार घरापासून काही अंतरावर लावली होती.

हेही वाचा >>>अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेतील दुसरी गुणवत्ता यादी उद्या… प्रवेश कधीपर्यंत घेता येणार?

केंगार याच्यासोबत मोटारीत आणखी कोण होते, या दृष्टीने पोलिसांकडून तपास करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी राॅबिन आठवल आणि सिद्धार्थ लालबिगे या दोघांना अटक केली. हे तिघे विश्रांतवाडीतील धानाेरी भागात मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गेले होते. पोरवाल रस्त्यावर चैाघांनी मद्यप्राशन केले. पार्टी झाल्यानंतर केंगार आणि मित्र मोटारीतून मध्यरात्री एकच्या सुमारास बोपोडीकडे निघाले. त्यानंतर बोपोडीतील भुयारी मार्गाजवळ मोटारचालक केंगारने दुचाकीवरील पोलिसांना धडक दिल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.

केंगारची बेपर्वाई आणि मद्याची नशा

खडकी भागात मध्यरात्री केंगारला ओलांडून एक मोटारचालक पुढे गेला. मोटारचालक पुढे गेल्याने मद्याच्या नशेत असलेला केंगार चिडला आणि त्याने मोटारीचा वेग वाढविला. भरधाव वेग आणि बेपवाईमुळे अपघात झाला. त्यामध्ये कोळी यांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The motorist who crushed the constable with a speeding car was found to be under the influence of alcohol pune print news rbk 25 amy