पुणे : मुळा-मुठा नदीकाठ पुनरूज्जीवन, संवर्धन आणि सुशोभीकरण योजनेच्या कामाअंतर्गत नदीकाठ परिसरात कोणतीही वृक्षतोड होणार नसून जुने आणि दुर्मिळ वृक्षही कायम राहणार आहेत. बाधित वृक्षांची तोड न करता त्यांचे जतन केले जाणार असून ६५ हजार वृक्षांची लागवड केली जाणार असल्याचा दावा महापालिका प्रशासनाकडून करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

  साबरमती नदीच्या धर्तीवर महापालिकेकडून  मुळा-मुठा नदीकाठ पुनरूज्जीवन, संवर्धन आणि सुशोभीकरण योजनेची पाच हजार कोटींची योजना हाती घेण्यात आली आहे. त्यापैकी बंडगार्डन येथे कामे सुरू करण्यात आली असून त्यासाठी किमान सहा हजार वृक्षांची तोड केली जाणार आहे. त्याविरोधात शहरातील पर्यावरण प्रेमी, स्वयंसेवी संस्थांनी विरोध दर्शविला आहे. तसेच अकरा पर्यावरण प्रेमींनी त्यांचा पर्यावरण दूत पुरस्कार महापालिकेला परत केला आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून त्याबाबतचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

हेही वाचा >>> पुणे: संयुक्त पूर्व परीक्षेत गैरप्रकार रोखण्यासाठी एमपीएससीचा मोठा निर्णय

मोठ्या प्रमाणावर वृक्ष तोड होत असल्याचे वृत्त चुकीचे आहे. प्रकल्पांतर्गत संगम ब्रीज ते बंडगार्डन आणि बंडगार्डन ते मुंढवा याठिकाणी कामांना सुरुवात करण्यात आली आहे. पुनरुज्जीवनाचे काम करीत असताना नदी लगत असणारी ६ हजारांपेक्षा जास्त वृक्ष तोडले जाणार असल्याचे तसेच  या वृक्षांमध्ये  जुनी आणि दुर्मिळ झाडे सामाविष्ट आहेत, अशी चुकीची माहिती सांगितली जात आहे.  प्रत्यक्षात या माहितीमध्ये कोणतेही तथ्य नाही. उलट, नदी काठच्या बाधित होणाऱ्या वृक्षांपैकी ३ हजार १४२ वृक्ष न काढता त्यांचे जतन केले जाणार आहे. तर, नदी पुनरुज्जीवनाचे काम करताना जे वृक्ष काढणे अत्यावश्यक आहे, त्यांच्या बदल्यात ६५ हजारांपेक्षा जास्त वृक्ष लावले जाणार आहेत. यामुळे शहराच्या मध्यभागी वाहणाऱ्या नदीच्या दोन्ही काठांवर हरीतपटा निर्माण होण्यास मदत होणार आहे.

हेही वाचा >>> पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघातात खासगी ट्रॅव्हल्स बस उलटली

  नदी पुनरुज्जीवन प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या वृक्षांमध्ये सुबाभूळ, कुबाभूळ, काटेरीबाभूळ, विलायती चिंच अशा झाडांचे प्रमाण  जास्त आहे. संगमवाडी ते बंडगार्डन या टप्प्याचे काम करीत असताना  बाधित होणाऱ्या एकूण वृक्षांपैकी १ हजार ५३८ झाडे संपूर्ण काढणे प्रस्तावित आहे. त्यापैकी बाभूळ ४४१, सुबाभूळ ८०४ आणि विलायती बाभूळ, विलायती किकर  ४८९ अशी सुमारे १ हजार ५३४ झाडे ही सुबाभूळ, कुबाभूळ, काटेरी बाभूळ, विलायती चिंच या प्रजातीमधील आहेत. हे प्रमाण एकूण काढावयाच्या वृक्षांच्या तुलनेत जवळपास ९९ टक्के आहे. तर, याशिवाय खैर २, निलगिरी २  अशी चार वृक्ष काढण्यात येणार आहेत.

हेही वाचा >>> “शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर यांची भेट महाविकास आघाडीसाठी सकारात्मक”

 बंडगार्डन ते मुंढवा या टप्प्याचे काम करीत असताना १ हजार ५७२ वृक्ष संपूर्ण काढणे प्रस्तावित आहेत. यामध्येही १ हजार २५३ वृक्ष सुबाभूळ, कुबाभूळ, काटेरी बाभूळ, विलायती चिंच प्रजातीमधील असून अशा झाडांचे प्रमाण हे एकूण काढावयाच्या झाडांच्या ७९ टक्के आहे. या टप्प्यात बाभूळ ४२०, रेन ट्री ६६, निलगिरी ४, सुबाभूळ ४१६, आंबा ४३, अशोक १, नारळ ४३, विलायती बाभूळ, विलायती किकर,  विलायती चिंच ५७९ अशी एकूण १ हजार ५७२ झाडे पूर्ण काढणे प्रस्तावित आहे,अशी  माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. नदी पुनरुज्जीवन प्रकल्पासाठी बाधित होणाऱ्या वृक्षांबाबत सर्वेक्षण करण्यात आले होते. हे सर्वेक्षण करताना वृक्षांना एक फलक लावून त्याला क्रमांक देण्यात आला होता. केवळ वृक्षांची संख्या मोजता यावी, यासाठी सर्वेक्षणाचा भाग म्हणून हे फलक लावण्यात आले होते, असेही महापालिकेडून सांगण्यात आले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The municipal administration 65 thousand trees will be planted pune print news apk 13 ysh
Show comments