शहरातील अतिवृष्टीच्या तडाख्यानंतर राजकीय पक्षांत आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असताना महापालिका प्रशासनानेही जबाबदारीपासून पळ काढण्याचा प्रयत्न केला. शहरात ६० ते ६५ मिलीमीटर पाऊस झाल्यातर पावसाचे पाणी वाहून नेण्याची पावसाळी गटारांची क्षमता आहे. मात्र अडीच तासांमध्ये १०५ मिलिमीटर पाऊस पडला. त्यामुळे पाणी तुंबण्याची परिस्थिती ओढावली, असे सांगत महापालिका आयुक्त, प्रशासक विक्रम कुमार यांनी शहर तुंबण्याचे खाबर जास्त झालेल्या पावसावर फोडले. हा पाऊस म्हणजे ढगफुटीच होता, असा दावाही आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडून करण्यात आला.
शहरात सोमवारी रात्री झालेल्या अतिवृष्टीने दाणादाण उडवली. अडीच तासांत शहर पाण्यात गेले. रस्त्यांवर पाण्याची तळी साचली. त्यामुळे महापालिकेच्या कारभारावर टीका सुरू झाली. या पार्श्वभूमीवर आयुक्त, प्रशासक विक्रम कुमार यांनी मंगळवारी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी या सर्व परिस्थितीचे खापर जास्त पावसावर फोडले.

हेही वाचा >>>पुणे: तासिका तत्त्वावरील पात्रताधारक प्राध्यापकांच्या हिताच्या शिफारशी स्वीकारा; महाराष्ट्र नवप्राध्यापक संघटनेची मागणी

शहरातील पावसाळी गटारांची क्षमता ६० ते ६५ मिलीमीटर एवढ्या पावसाचे पाणी वाहून नेण्याची आहे. त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्याने रस्त्यावर पाणी आले. माती, प्लास्टिक आणि अन्य कचरा पाण्यासोबत वाहत आल्याने गटारे तुंबली. सिमेंट रस्ते करताना पावसाळी गटारे, वाहिन्या टाकल्या जातात. मात्र जास्त पाऊस पडल्याने रस्त्यावरून पाणी वाहिले. दोन दिवसांत रविवार आणि सोमवारी अनुक्रमे ७८ आणि १०५ मिलिमीटर एवढा पाऊस झाला. त्यातच मेट्रोच्या कामामुळेही पाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण झाला, असे विक्रम कुमार यांनी सांगितले.

हेही वाचा >>>पुणे: हवेली तालुक्यातील शेतकऱ्यांची दहा लाखांची फसवणूक

पावसाळी गटार टाकताना मागील १०० वर्षांतील पावसाचा विचार करून ६० ते ६५ मिमी पाऊस पडला तरी त्याचे पाणी वाहून जाईल अशी व्यवस्था केली आहे. पण पाऊस पडण्याचे प्रमाण वाढत असल्याने शहरातील महत्त्वाचे रस्ते, चौक या ठिकाणी पाणी साचू नये यासाठी पावसाळी गटारांची क्षमता वाढविण्यासाठी आम्ही नियोजन करू.- विक्रम कुमार, आयुक्त, पुणे महापालिका

Story img Loader