वाहतूक कोंडी टाळण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून विकसित करण्यात आलेला बीआरटी मार्ग कोणत्याही परिस्थितीत बंद ठेवला जाणार नाही. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील पीएमपीचा बीआरटी हा महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे तो बंद करता येणार नाही, असे महापालिका आयुक्त, प्रशासक विक्रम कुमार यांनी स्पष्ट केले आहे.
हेही वाचा >>>राज्यातील तापमानात पुन्हा बदल ; ऊन वाढण्याची आणि गारवा घटण्याची शक्यता
वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी आणि जलदगतीने प्रवास करता यावा यासाठी बस रॅपिड ट्रान्झिट- बीआरटी सेवा सुरू करण्यात आली असली तरी शहरातील वाहतूक कोंडीला बीआरटी मार्ग कारणीभूत असल्याचा ठपका ठेवत पोलिसांनी या वाहतूक कोंडीचे खापर महापालिकेवर फोडले होते. वाहतूक कोंडी कमी करायची असेल तर, सर्व बीआरटी मार्ग बंद करा आणि अनावश्यक सायकल मार्ग काढून टाका, असे पत्र पोलिसांनी महापालिकेला पाठविले आहे. पोलिसांच्या पत्रानुसार बीआरटी मार्ग बंद करण्यासंदर्भात महापालिका प्रशासनाकडून पीएमपीकडे विचारणा करण्यात आली होती. त्यावर पीएमपी प्रशासनाने मार्ग कायम ठेवा मात्र काही गाड्यांना मार्गातून जाण्या-येण्यास परवानगी द्यावी, अशी सूचना महापालिकेला केली आहे. त्यानंतर महापालिका आयुक्त, प्रशासक विक्रम कुमार यांनी बीआरटी मार्ग बंद होणार नाही, अशी स्पष्ट भूमिका घेतली आहे.