जेजुरी व परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या कऱ्हा नदीवरील नाझरे धरणात फक्त दीड महिना पुरेल एवढाच पाणी साठा शिल्लक राहिला आहे.पावसाळा सुरू होऊन दोन महिने झाले तरी पुरेशा पावसाअभावी अद्यापि धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झालेली नाही, त्यामुळे या परिसरात चिंतेचे वातावरण आहे. या धरणाची पाणीसाठाक्षमता ७८८ दशलक्ष घनफूट असून यातील ५८८ दशलक्ष घनफूट साठा उपयुक्त आहे. तर २०० दशलक्ष घनफूट पाणीसाठा मृत मानला जातो. या धरणाचे एकूण पाणलोट क्षेत्र ३९७.८२ चौरस किलोमीटर आहे,सध्या या धरणामध्ये मृत साठ्यापैकी फक्त १५६ दशलक्ष घनफूट पाणी शिल्लक आहे, त्यामध्येही गाळ भरपूर आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सासवड, गराडे, सोमर्डी,कोडीत,चांबळी, भिवडी, पुरंदर किल्ला परिसर, नारायणपूर,आदी भागात चांगला पाऊस झाल्यास पाणी कऱ्हा नदीतून नाझरे धरणात येते , परंतु पुरंदर तालुक्यातच पावसाचे प्रमाण कमी असल्याने या धरणात अद्यापि पाणी आलेले नाही. त्यामुळे धरणाचे पात्र कोरडे पडत चालले आहे. गराडे धरण ५० टक्के भरले ते पूर्ण भरल्यानंतर वाटेतील सर्व बंधारे भरत पाणी नाझरे धरणात येणार आहे.

नाझरे धरणातून जेजुरी गाव,जेजुरी औद्योगिक वसाहत,इंडियन सिमलेस कंपनी, मोरगाव व १६ गावे, नाझरे व पाच गावे व शेतीसाठी पाणीपुरवठा केला जातो,सुमारे ३१५० हेक्टर शेतीचे क्षेत्र ओलिताखाली आहे. नाझरे धरणात अद्यापही पाणीसाठा न वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये काळजीचे वातावरण आहे. धरणाच्या परिसरात एक जून पासून १३० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे,गेल्या वर्षी हाच पाऊस ९९६ मिलिमीटर होता. जेजुरी हे तीर्थक्षेत्र आहे येथे येणाऱ्या भाविकांना याच धरणातील पाणी पुरविले जाते.पुरंदर तालुक्यात अद्यापही पुरेसा पाऊस नसल्याने बऱ्याचशा पेरण्या रखडल्या होत्या परंतु गेले चार-पाच दिवस रिमझिम पाऊस झाल्याने खरिपाच्या पेरण्या होण्याची शक्यता आहे.

पाणीसाठा आटल्याने विविध योजनांना दिवसाआड पाणीपुरवठा

नाझरे धरणात सध्या गाळमिश्रित पाणी शिल्लक राहिल्याने संभाव्य पाणी टंचाईचे संकट लक्षात घेऊन सर्व पाणीपुरवठा योजनांना सध्या दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. भविष्यात धरणातील पाणीसाठ्यात वाढ होण्याची अपेक्षा आहे. पाणीसाठा न वाढल्यास पंधरा दिवसांनंतर फक्त पिण्यासाठीच काही तास पाणीपुरवठा केला जाणार आहे, अशी माहिती नाझरे सिंचन विभागाचे अधिकारी विश्वास पवार व शाखा अभियंता अनिल घोडके यांनी दिली.