तंत्रशिक्षणात वेगाने प्रगती होत असल्याने या क्षेत्रातील ज्ञानाकडे बारकाईने लक्ष न दिल्यास जगात आपण मागे पडू. त्यामुळे विद्यापीठांनी परस्पर सहयोगाद्वारे तंत्रशिक्षणाला प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचे मत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मंगळवारी मांडले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – पिंपरी पालिकेतील प्रशासकीय काळातील संशयास्पद कामांच्या चौकशीची मागणी

लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात उभारण्यात आलेल्या प्रादेशिक केंद्राचे उद्घाटन कोश्यारी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कारभारी काळे, विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेश पांडे, कार्यकारी परिषद सदस्य डॉ. विवेक वडके, प्र-कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.भगवान जोगी आदी या वेळी उपस्थित होते.

कोश्यारी म्हणाले, की विद्यापीठांमधील परस्पर सहकार्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करण्यात येत आहे. मात्र विद्यार्थ्यांकडून तयार केली जाणारी नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानयुक्त उपकरणे, वस्तू प्रत्यक्ष बाजारात आणि व्यवहारात उपयोगात येण्यासाठी त्यात अचूकता आणण्यासाठी शिक्षक, प्राध्यापकांनी प्रयत्न करावेत. तंत्रशास्त्र किंवा आरोग्यसारख्या एखाद्या विशेष शाखेच्या विद्यापीठाची निर्मिती त्या क्षेत्रातील विशेष अभ्यासक्रम राबविण्यासाठी करण्यात येते. त्यामुळे अशा प्रादेशिक केंद्राच्या माध्यमातून इतर विद्यापीठांशी जोडलेल्या शैक्षणिक संस्थांना लाभ होईल. त्यादृष्टीने सुरू करण्यात आलेले डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे प्रादेशिक केंद्र शिक्षणातील उत्तमतेला चालना देणारे केंद्र बनावे.

हेही वाचा – पुणे : कुऱ्हाडीने मारहाण करीत पेट्रोलपंपावर दरोडा ; भूमकर चौकातील घटनेने खळबळ

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व्यवस्थापनाने प्रादेशिक केंद्रासाठी साडेआठ हजार चौरस फुटांची जागा उपलब्ध करून दिली. विद्यापीठाकडून केंद्रासाठी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. सायबर सुरक्षा, रिमोट सेन्सिंग आणि जीआय या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांसह अन्य दोन नवीन अभ्यासक्र सुरू करण्यात येत असल्याची माहिती डॉ. काळे यांनी दिली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The need for universities to promote technical education through mutual cooperation governor bhagat singh koshyari pune print news amy