पुणे : जीवनाच्या विविध क्षेत्रात एकरूपता आणून भारताचा विश्वकल्याणाचा शाश्वत विचार जगाला देण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे, असे मत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शुक्रवारी व्यक्त केले. भारतीय विचारांवर अतूट विश्वास असेल, तर आपल्याला कोणी आता थांबवू शकणार नाही, असेही ते म्हणाले.‘सेंटर फॉर इंटिग्रल स्टडीज अँड रिसर्च संस्थे’तर्फे (सीआयएसआर) ‘एकात्म मानव दर्शन-संकल्पना कोश’ या ग्रंथाचे प्रकाशन भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी कोश्यारी बोलत होते.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे, प्रज्ञाप्रवाहचे राष्ट्रीय प्रवर्तक नंदकुमार, कार्याध्यक्ष रवी देव, संपादक रवींद्र महाजन, प्रशांत साठे या वेळी उपस्थित होते. कोश्यारी म्हणाले, पं. दीनदयाळ उपाध्याय यांनी एकात्म मानववाद या शब्दाचा उपयोग केला. समग्र जगाच्या कल्याणासाठी सर्व विचारांच्या साररूपाने हा विचार त्यांनी मांडला. भारताचा विश्वकल्याणाचा विचार शाश्वत आहे. त्यावर दृढ श्रद्धा ठेवून जगाला मानवकल्याणाचा संदेश प्रभावीपणे देत येईल.
हेही वाचा : राज्य सहकारी बँक्स असोसिएशनच्या निवडणुकीत २१ पैकी दहा संचालक बिनविरोध
होसबळे म्हणाले, एकात्म मानववाद हा कोश आहे. ही कांदबरी नाही, शब्दकोश नाही आणि माहितीचा स्रोतही नाही. मात्र, त्या प्रत्येकाचा अंश यात आहे. या कोशासाठी अनेक संदर्भ तपासण्याचे आव्हान संपादक मंडळाने पेलले असून कोशाचा निश्चितच समाजाला उपयोग होईल. ‘सीआयएसआर’च्या हरिभाऊ मिरासदार यांनी प्रास्ताविकात ग्रंथलेखनाच्या उद्देशाविषयी माहिती दिली.