चाकणच्या खराबवाडी येथे रविवारी मध्यरात्री खूनाची घटना घडली आहे. बघून थुंकत असल्याचा राग मनात ठेवून एकाने त्याच्या शेजाऱ्याचा चक्क कोयत्याने वार करून खून केला. या दोघांमध्ये किरकोळ कारणावरून वाद होत असल्याचेही समोर आले आहे. विजय गायकवाड (वय-४२) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर, मुकेश घोलप (वय-२३) असे आरोपी शेजाऱ्याचे नाव आहे. या घटनेप्रकरणी म्हाळुंगे पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत विजय यांचा मुलगा दीपक आणि आरोपी मुकेश यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला होता. तेव्हा, त्यांच्यातील वाद मिटवला गेला परंतु दीपकचे वडील मृत विजय गायकवाड यांच्या मनात मुलाला मारल्याचा राग कायम होता. त्यामुळे मुकेश दिसल्यानंतर ते थुंकायचे. तर  दारू प्यायल्यानंतर अनेकदा मुकेश आणि विजय यांच्यात वाद झाले होते. आरोपी मुकेश हा जामिनावर बाहेर असून त्याच्यावर पोलिसांच्या अंगावर गाडी घातल्याचा गुन्हा दाखल आहे.

मृत विजय गायकवाड यांच्या वागण्याचा आरोपी मुकेश याला देखील प्रचंड राग येत होता, वेळ आल्यानंतर तुला बघून घेईन अशी देखील त्याने विजय गायकवाड यांना धमकी दिली होती. दोघेही एकमेकांच्या शेजारीच राहत असल्याने त्याने ही संधी साधत विजय यांच्यावर कोयत्याने वार करत त्यांचा खून केला. यानंतर पोलिसांनी आरोपी मुकेशला ताब्यात घेतले आहे. पोलीस उपनिरीक्षक सूर्यवंशी हे याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.