पुणे: पुणे विमानतळावर मागील काही वर्षांत प्रवाशांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या गर्दीमुळे अनेक पायाभूत सुविधा अपुऱ्या पडू लागल्या. त्यामुळे पुणे विमानतळावरील नवीन टर्मिनलचे काम हाती घेण्यात आले. हे काम पूर्ण होऊन काही महिन्यांचा कालावधी उलटूनही त्याचे उद्घाटन झालेले नाही. केंद्रीय हवाई वाहतूक मंत्रालयाची मंजुरी नसल्याने उद्घाटन रखडले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, नवीन टर्मिनल सुरू न झाल्याने जुन्या इमारतीचे नूतनीकरणही रखडले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे विमानतळावरील नवीन एकात्मिक टर्मिनलचे काम पूर्ण झाले आहे. हे टर्मिनल पूर्णपणे वातानुकूलित आहे. त्यात प्रवाशांसाठी पाच पादचारी पूल असून, याचबरोबर ३४ चेक-इन काऊंटर असतील. तसेच, बॅगांसाठी इन-लाईन बॅगेल हँडलिंग सिस्टिम असेल. या टर्मिनलमध्ये २७ हजार चौरस फुटांमध्ये पादचारी उड्डाणपूल आणि विक्री केंद्रांसोबत प्रवाशांसाठी सर्व अत्याधुनिक सुविधा आहेत. नवीन टर्मिनलसाठी एकूण किंमत ४७५ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.

हेही वाचा… नगर-कल्याण महामार्गावर डिंगोरे गावाजवळ ट्रकची वाहनांना धडक; आठ जणांचा मृत्यू

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नवीन टर्मिनलचे काम पूर्ण झालेले आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडून नवीन टर्मिनलची सहा आठवडे चाचणी घेतली जाणार आहे. नवीन टर्मिनल योग्य पद्धतीने कार्य करीत असल्याची खातरजमा केली जाणार आहे. मात्र, नवीन टर्मिनलच्या उद्घाटनाला केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाची मंजुरी मिळालेली नाही. टर्मिनलचे उद्घाटन झाल्यानंतर चाचण्या सुरू होतील. या चाचण्यांनंतर प्रत्यक्ष टर्मिनलचा वापर करण्यास परवानगी मिळेल. नवीन टर्मिनल सुरू झाल्यानंतर जुन्या इमारतीचे नूतनीकरण सुरू केले जाणार आहे.

विमानतळाची जुनी इमारत आणि नवीन टर्मिनल एकमेकांशी जोडली जाणार आहे. पादचारी पुलांद्वारे या दोन्ही इमारती जोडल्या जातील. पुण्याची सांस्कृतिक ओळख दाखवणारी ही नवीन इमारत आहे. नवीन टर्मिनल सुरू झाल्यानंतर विमानतळाची प्रवासी क्षमता जवळपास दुपटीने वाढणार आहे.

पुण्यातील हवाई प्रवासी

  • जुन्या इमारतीची वार्षिक क्षमता : ७१ लाख
  • नवीन टर्मिनलची वार्षिक क्षमता : १ कोटी २० लाख
  • एकत्रित वार्षिक क्षमता : १ कोटी ९१ लाख

असे असेल नवीन टर्मिनल

  • एकूण क्षेत्रफळ : ५ लाख चौरस फूट
  • तासाला प्रवासी क्षमता : १ हजार ४००
  • बोर्डिंग पूल : ५
  • प्रवासी लिफ्ट : १५
  • सरकते जिने : ८
  • चेक-इन काऊंटर : ३४