पुणे : पुणे विमानतळावर मागील काही वर्षांत प्रवाशांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे पुणे विमानतळावरील नवीन टर्मिनलचे काम हाती घेण्यात आले. हे काम पूर्ण होऊन काही महिन्यांचा कालावधी उलटूनही त्याचे अद्याप उद्घाटन झालेले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या टर्मिनलचे उद्घाटन करण्याचा घाट घालण्यात आला. मात्र, त्यांची वेळ मिळत नसल्याने उद्घाटनाला मुहूर्त लागत नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.
पुणे विमानतळावरील नवीन एकात्मिक टर्मिनलचे काम पूर्ण झाले आहे. हे टर्मिनल पूर्णपणे वातानुकूलित आहे. त्यात प्रवाशांसाठी पाच पादचारी पूल असून, याचबरोबर ३४ चेक-इन काउंटर असतील. तसेच, बॅगांसाठी इन-लाइन बॅगेज हँडलिंग सिस्टिम असेल. या टर्मिनलमध्ये २७ हजार चौरस फुटांमध्ये पादचारी उड्डाणपूल आणि विक्री केंद्रांसोबत प्रवाशांसाठी सर्व अत्याधुनिक सुविधा आहेत. नवीन टर्मिनलसाठी एकूण ४७५ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री जोतिरादित्य शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी टर्मिनलची पाहणी केली होती. नवीन टर्मिनल सुरू झाल्यानंतर जुन्या इमारतीचे नूतनीकरण केले जाणार आहे.
हेही वाचा – कांदा निर्यातीला केंद्राची परवानगी, मुख्यमंत्र्यांची माहिती; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
नवीन टर्मिनलचे काम पूर्ण झालेले आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडून नवीन टर्मिनलची सहा आठवडे चाचणी घेतली जाणार आहे. ते योग्य पद्धतीने कार्य करीत असल्याची खातरजमा केली जाणार आहे. मात्र, नवीन टर्मिनलच्या उद्घाटनाला केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाची मंजुरी मिळालेली नाही. टर्मिनलचे उद्घाटन झाल्यानंतर चाचण्या सुरू होतील. या चाचण्यांनंतर प्रत्यक्ष टर्मिनलचा वापर करण्यास परवानगी मिळेल, असेही सूत्रांनी सांगितले.