पुणे : पावसाळा सुरू होताच अनेक आजारांचा प्रसार सुरू होतो. या काळातील वातावरण बदलाचा त्रास लहान मुलांना सर्वाधिक होतो, कारण त्यांची प्रतिकारशक्ती कमकुवत असते. सध्या लहान मुलांमध्ये श्वसनमार्ग संसर्ग, सर्दी, फ्लूसारखे आजार आणि डोळ्यांच्या संसर्ग वाढला आहे. लहान मुलांमधील आजारपणात वाढ झाल्याचे निरीक्षण बालरोगतज्ज्ञांनी नोंदविले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ताप, खोकला, सर्दी, जुलाब, उलट्या, अंगदुखी, डोकेदुखी, भूक न लागणे अशा तक्रारी घेऊन अनेक मुले उपचारासाठी येत आहेत. यामध्ये १० वर्षांखालील मुलांचा प्रामुख्याने समावेश आहे. ही मुले शाळेत जाणारी असल्याने तिथे एकमेकांच्या संपर्कात आल्याने हा संसर्ग वाढत असल्याचे दिसून येत आहे. पावसाळ्यात अनेक प्रकारचे जंतू आणि संसर्ग आढळून येतात. पालकांनी आपल्या मुलांना या आजारांना बळी पडण्यापासून वाचवणे आणि आवश्यक ती खबरदारी घेणे गरजेचे आहे. या ऋतूतील वाढत्या आर्द्रतेमुळे जंतूंची संख्या वाढते. पुण्यात काही दिवसांपासून डेंग्यूची साथ वाढत आहे. त्यामुळे काळजी घेण्याचा सल्लाही बालरोगतज्ज्ञांनी दिला आहे.

हेही वाचा – तरुणीने धमकावून केले अल्पवयीन मुलावर अत्याचार

याबाबत लुल्लानगरमधील मदरहूड हॉस्पिटलमधील बालरोगतज्ज्ञ डॉ. वृषाली बिचकर म्हणाल्या की, लहान मुलांना न चुकता फ्लूची लस देणे आवश्यक आहे. हातांची स्वच्छता, शिंकताना किंवा खोकताना नाक आणि तोंड झाकणे, मास्कचा वापर अशा गोष्टी मुलांना पाळायला सांगाव्यात. रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी आहारात भाज्या आणि फळांचा समावेश करावा. आजारपणात मुलांना शाळेत पाठवणे टाळा. संसर्ग होऊ नये म्हणून पुरेशी खबरदारी घेणे आवश्यक आहे. आमच्याकडे दर महिन्याला डेंग्यूचा संसर्ग झालेली किमान ५ मुले उपचारासाठी येत आहेत.

हेही वाचा – पुणे : येरवड्यात कोयता गँगची दहशत; तरुणावर हल्ला

पावसाळ्यात जागोजागी पाण्याची डबकी साचलेली असतात. त्यात घाण पाणी साचून अतिसार, विषमज्वर, कावीळ यांसारख्या आजारांची लागण होते. ताप येणे, डोकेदुखी, जुलाब, ओटीपोटात दुखणे, सांधेदुखी अशी लक्षणे मुलांमध्ये आढळून आल्यास पालकांनी त्वरित वैद्यकीय मदत घ्यावी. मुलाला सर्दी, ताप, खोकला असल्यास तो बरा झाल्यानंतर तीन ते चार दिवसांनी त्याला शाळेत पाठवावे. – डॉ. इरफान पल्ला, बालरोगतज्ज्ञ, अपोलो स्पेक्ट्रा रुग्णालय

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The number of children getting sick increased pune print news stj 05 ssb