पुणे : भारतातील करोना रुग्णसंख्येच्या सर्वेक्षणाबाबत बनारस हिंदू विद्यापीठाने नुकताच एक अहवाल दिला आहे. करोना काळात सरकारकडून करण्यात आलेल्या रुग्णसंख्या सर्वेक्षणात समोर आलेल्या रुग्णसंख्येच्या तुलनेत प्रत्यक्ष  संख्या ही किमान १७ पटीने अधिक असल्याचे या विद्यापीठाने म्हटले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारतातील सुमारे साडेचार कोटी नागरिकांना आतापर्यंत करोनाचा संसर्ग झाल्याचे सरकारी आकडेवारी सांगते. मात्र, करोनाबाधित भारतीयांचे प्रमाण हे लोकसंख्येच्या किमान ५८ ते ९८ टक्के एवढे असल्याचे संसर्गजन्य आजारांबाबतच्या आंतरराष्ट्रीय नियतकालिकाने (इंटरनॅशनल जर्नल ऑफ इन्फेक्शिअस डिसीजेस) म्हटले आहे. यापूर्वी देखील अनेक वैद्यकीय नियतकालिके आणि संशोधनांमधून भारतातील दैनंदिन रुग्णसंख्या सर्वेक्षणातून खरी रुग्णसंख्या समोर येत नसल्याचा दावा करण्यात आला होता. आता, बनारस हिंदू विद्यापीठाचाही त्यात समावेश झाला आहे.

देशातील ३४ संस्थांच्या ८८ शास्त्रज्ञांनी या संशोधनात सहभाग घेतला. सप्टेंबर ते डिसेंबर २०२० या कालावधीत देशाच्या सहा राज्यांमध्ये करण्यात आलेल्या सिरो सर्वेक्षणावरून २६ ते ३५ वर्ष वयोगटातील मोठय़ा लोकसंख्येला लक्षणविरहित करोना संसर्ग होऊन गेल्याचे दिसून आले. हे सर्वेक्षण करताना शून्य लक्षणे आणि करोना निदानासाठी केली जाणारी आरटी-पीसीआर चाचणी कधीही केलेली नसणे हे दोन निकष लावण्यात आले. सिरो सर्वेक्षणातून समोर आलेल्या माहितीवरून देशातील करोना बाधितांची संख्या ही प्रत्यक्ष नोंदीपेक्षा किमान १७ पट अधिक असल्याचे बनारस हिंदू विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.

रुग्णसंख्येची वास्तवदर्शी कल्पना..

सदर सिरो सर्वेक्षण देशातील शहरी भागात आणि प्रामुख्याने सातत्याने बाहेर काम करणारे विक्रेते, व्यापारी, सेवा पुरवठादार यांच्यामध्ये करण्यात आले. विशिष्ट भौगोलिक प्रदेशात संसर्ग झालेल्या नागरिकांच्या वारंवारितेचा अभ्यास करण्यासाठी या सर्वेक्षण पद्धतीचा वापर करण्यात आला आहे. ज्या नागरिकांमध्ये करोना विरुद्ध प्रतिपिंडे (अँटीबॉडी) आढळली त्यांची संख्या ही प्रत्यक्ष नोंदवण्यात आलेल्या रुग्णसंख्येच्या तुलनेत किती तरी पटीने अधिक असल्याचे बनारस हिंदू विद्यापीठाकडून सांगण्यात आले आहे. सिरो सर्वेक्षणातून समोर आलेली माहिती गणितीय प्रारूप स्वरूपात मांडली असता भारतातील वास्तवदर्शी रुग्णसंख्येची कल्पना येते, असेही बनारस हिंदू विद्यापीठाने आपल्या अहवालात म्हटले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The number of corona patients 17 times official figures reports banaras hindu university ysh