पुणे: देशातील जंगलांना आग लागण्याचे प्रमाण घटले आहे. केंद्रीय वने आणि पर्यावरण मंत्रालयाने घटक राज्यांच्या आणि केंद्रशासित प्रदेशांच्या वन खात्याच्या मदतीने केलेल्या उपाययोजनांमुळे आणि आगीवर नियंत्रण आणण्यासाठी तयार केलेल्या कृती आराखड्यामुळे जंगलांना आग लागण्याच्या प्रमाणात घट झाल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे.
डेहराडून स्थित फॉरेस्ट सर्व्हे ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, नोव्हेंबर २०२२ ते जून २०२३ या काळात देशात २ लाख १२ हजार २४९ हेक्टर वन क्षेत्र जळून खाक झाले आहे. नोव्हेंबर २०२१ ते जून २०२२ या काळात २ लाख २३ हजार ३३३, नोव्हेंबर २०२० ते जून २०२१ या काळात सर्वाधिक ३ लाख ४५ हजार ९८९ आणि नोव्हेंबर २०१९ ते जून २०२० या काळात १ लाख २४ हजार ४७३ हेक्टर वन क्षेत्र जळून खाक झाले होते.
हेही वाचा… पिंपरीत अल्पवयीन मुलांच्या ‘कोयता गॅंग’चा हैदोस! दोघांच्या डोक्यात कोयत्याने वार, दागिन्यांची लूट
देशात २०२० ते जून २०२१ या काळात सर्वाधिक ३ लाख ४५ हजार ९८९ वन क्षेत्र जळून खाक झाले होते. त्यानंतर देशातील वनांचे संरक्षण करण्यासाठी केंद्रीय वने आणि पर्यावरण मंत्रालयाने घटक राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या वन मंत्रालयाच्या मदतीने जंगलांतील लहान, मोठ्या आगींवर नियंत्रण मिळविण्यासाठी राष्ट्रीय कृती आराखडा तयार केला होता. जंगलात राहणारे आदिवासी आणि जंगलाच्या सीमांवर राहणाऱ्या लोकांना आग लागू नये आणि लागलेली आग नियंत्रणात आणण्याचे प्रशिक्षण देण्यात आले होते. आग प्रतिबंधक रेषा (जाळ रेषा) मोठ्या प्रमाणावर काढण्यात आल्या होत्या. त्यासाठी केंद्र सरकारने फॉरेस्ट फायर प्रिव्हेंशन अँड मॅनेजमेंट योजना सुरू केली होती, त्याचा चांगला फायदा झाल्याचे दिसून आले आहे.
असे झाले वन संरक्षण…
- फॉरेस्ट फायर प्रिव्हेंशन अँड मॅनेजमेंट योजनेची अंमलबजावणी
- जंगलांत मोठ्या प्रमाणावर जाळ रेषांची निर्मिती
- जंगलात जलसंधारण करून जलसाठा वाढविला
- आदिवासी, जंगलांच्या सीमांवरील नागरिकांना प्रबोधन
- आगीमुळे प्राणी, पक्ष्यांचे अधिवासातून स्थलांतर टळले
- आगीच्या मोठ्या घटना, वन्यजीव, पर्यावरणाचा नाश टाळला