पुणे: पुणे मेट्रोची विस्तारित मार्गांवरील सेवा सुरू झाल्यानंतर प्रवासी संख्येत मोठी वाढ झाली होती. वनाझ ते रुबी हॉल आणि पिंपरी ते जिल्हा न्यायालय या विस्तारित मार्गांवरील प्रवासी संख्येला आता घरघर लागल्याचे समोर आले आहे. मेट्रोची प्रवासी संख्या नोव्हेंबर महिन्यात १४ लाखांवर आली असून, उत्पन्न २ कोटी २० लाख रुपयांवर घसरले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मेट्रोची विस्तारित सेवा ऑगस्टपासून सुरू झाली. वनाझ ते रुबी हॉल हा ९.७ किलोमीटरचा मार्ग आणि पिंपरी-चिंचवड महापालिका ते जिल्हा न्यायालय हा १३.९ किलोमीटरचा मार्ग सुरू झाला. मेट्रोतून ऑगस्ट महिन्यात २० लाख ४७ हजार प्रवाशांनी प्रवास केला होता आणि त्यातून मेट्रोला ३ कोटी ७ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. नंतर सप्टेंबर महिन्यात प्रवासी संख्या २० लाख २३ हजार होती आणि उत्पन्न २ कोटी ९८ लाख रुपये होते.

हेही वाचा… मानवी हस्तक्षेपामुळे दरवर्षी ,२०० कोटी टन धूळ वातावरणात; शेतजमिनी नापीक होण्याच्या धोक्यात वाढ

ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये २० लाखांवर असलेली प्रवासी संख्या ऑक्टोबरमध्ये १६ लाख ७२ हजारांवर आली. त्याचवेळी उत्पन्नही २ कोटी ४८ लाखांवर घसरले. आता नोव्हेंबरमध्येही प्रवासी संख्येतील घसरण सुरूच राहिली आहे. मागील महिन्यात मेट्रोतून १४ लाख १८ हजार प्रवाशांनी प्रवास केला. त्यातून मेट्रोला २ कोटी २० लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. ऑक्टोबरच्या तुलनेत नोव्हेंबरमध्ये मेट्रोच्या प्रवासी संख्येत सुमारे अडीच लाखांहून अधिक घसरण झाली असून, उत्पन्नात २८ लाखांची घट झाली आहे.

प्रवासी संख्या वाढविण्याचे आव्हान

मेट्रोचे आधी वनाझ ते गरवारे महाविद्यालय आणि पिंपरी ते फुगेवाडी हे मार्ग सुरू होते. मेट्रो सेवा मागील वर्षी ६ मार्चला सुरू झाली. ती सुरू झाल्यानंतर वर्षभरात दोन्ही मार्गांवर एकूण १९ लाख ७८ हजार १६० प्रवाशांनी प्रवास केला होता. त्यामुळे वर्षभरातील मेट्रोची दैनंदिन सरासरी प्रवासी संख्या पाच हजार होती. विस्तारित सेवेनंतर दैनंदिन प्रवासी संख्येने सुमारे ६५ हजारांचा आकडा गाठला होता. परंतु, सुरुवातीच्या काही दिवस दिसणारी प्रवासी संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. यामुळे घटणारी प्रवासी संख्या वाढविण्याचे आव्हान मेट्रोसमोर आहे.

मेट्रोची प्रवासी संख्येला ओहोटी

महिनाप्रवासीउत्पन्न (रुपयांत)
ऑगस्ट२० लाख ४७ हजार३ कोटी ७ लाख
सप्टेंबर२० लाख २३ हजार२ कोटी ९८ लाख
ऑक्टोबर१६ लाख ७२ हजार२ कोटी ४८ लाख
नोव्हेंबर१४ लाख १८ हजार२ कोटी २० लाख
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The number of metro passengers has decreased resulting in a significant drop in income pune print news stj 05 dvr