पुणे : राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०अंतर्गत वैद्यकीय आणि अभियांत्रिकी अभ्यासक्रम मराठीतून उपलब्ध करण्याचे प्रस्तावित आहे. मात्र, वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेत (नीट) विद्यार्थी मराठी माध्यमातून परीक्षा देण्याचा पर्याय नाकारत असल्याचे आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. वैद्यकीय अभ्यासक्रम मराठीतून उपलब्ध झाला, तरी किती विद्यार्थी त्याला पसंती देतील का, याबाबत आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मराठी माध्यमातून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा टक्का घटत असताना अन्य काही प्रादेशिक भाषांतून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे किंवा संख्या टिकून असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी मराठीच्या पर्यायाकडे पाठ फिरवणे चिंतेचा विषय आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राष्ट्रीय परीक्षा प्राधिकरणातर्फे (एनटीए) वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या नीट परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. या परीक्षेत विविध प्रादेशिक भाषांतून परीक्षा देण्याचा पर्याय उपलब्ध असतो. त्यात मराठी माध्यमाचाही समावेश आहे. मात्र, २०१९मध्ये ३१ हजार २३९ विद्यार्थ्यांनी मराठी माध्यमातून परीक्षा दिली होती. त्यानंतर गेल्या काही वर्षांत मराठीचा टक्का घसरता असल्याचे चित्र आहे. सन २०२०मध्ये ६ हजार २५८, २०२१मध्ये २ हजार ९१३, २०२२मध्ये २ हजार ३६८, २०२३मध्ये १ हजार ८३३ विद्यार्थ्यांनी मराठी माध्यमातून परीक्षा दिली होती. यंदा केवळ १ हजार ७५९ विद्यार्थ्यांनीच मराठी माध्यमाचा पर्याय निवडला.

आणखी वाचा- ‘आरटीई’ची सोडत जाहीर, सर्वाधिक अर्ज कोणत्या शाळेत?

एकीकडे मराठीतून परीक्षा देणाऱ्यांचा टक्का घसरत असला, तरी बंगाली, हिंदी, तमिळ, ऊर्दू अशा काही प्रादेशिक भाषांतून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा टक्का वाढतो आहे किंवा विद्यार्थिसंख्या टिकून असल्याचे आकडेवारीतून दिसून येते. उदाहरणार्थ, २०१९मध्ये हिंदी माध्यमातून १ लाख ७९ हजार ८५७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. २०२०मध्ये २ लाख ४ हजार ३९९, २०२१मध्ये २ लाख २८ हजार ६४१, २०२२मध्ये २ लाख ५८ हजार ८२७, २०२३मध्ये २ लाख ७६ हजार १८०, तर यंदाच्या परीक्षेत ३ लाख ५७ हजार ९०८ विद्यार्थ्यांनी हिंदी माध्यमाला पसंती दिली. तसेच बंगाली माध्यमातून ४८ हजार २६५, गुजराती माध्यमातून ५८ हजार ८३६, ऊर्दू माध्यमातून १ हजार ५४५, तमिळ भाषेतून ३० हजार ५३६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.

या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०मध्ये वैद्यकीय अभ्यासक्रम मराठी भाषेत उपलब्ध करण्याचे प्रस्तावित आहे. त्या दृष्टीने कामही सुरू झाले आहे. मात्र प्रवेश परीक्षेसाठी मराठी माध्यमाचा पर्याय उपलब्ध असूनही विद्यार्थी त्याकडे पाठ फिरवत असल्याने मराठीतून वैद्यकीय अभ्यासक्रमाला विद्यार्थी पसंती देतील का, याबाबत साशंकता निर्माण होते.

आणखी वाचा- नीट परीक्षेच्या निकालावरुन रणकंदन; नेमके काय घोळ झालेत?

जागृतीसाठी शासनाने काम करण्याची गरज

मराठीतून नीट परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा टक्का कमी होणे योग्य नाही. नीटमध्ये मराठी माध्यमाचा पर्याय विद्यार्थी का निवडत नाहीत, मराठीतून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या का घटते आहे, याची कारणे शोधणे गरजेचे आहे. त्यासाठी राज्य शासनाने समिती नियुक्त करून स्वतंत्रपणे अभ्यास केला पाहिजे. त्याशिवाय मराठी माध्यमातून नीट प्रवेश परीक्षा देता येते याची जागृती शिक्षण विभागाने करायला हवी. तसेच मराठीतून परीक्षा देण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळण्यासाठी मराठीतून अभ्यास साहित्य उपलब्ध करणे, मराठीतून सराव परीक्षा घेणे गरजेचे आहे. अशा प्रकारे पुढील किमान पाच वर्षे काम करावे लागेल. त्यासाठी शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे, आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा सहभाग गरजेचे आहे. तसेच अकरावी-बारावीला मराठी विषय सक्तीने शिकवला पाहिजे. अन्य राज्ये भाषेसंदर्भात जी आग्रही भूमिका घेतात, ती महाराष्ट्रानेही घेण्याची नितांत गरज आहे, असे भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The number of students giving the neet exam in marathi decreased pune print news ccp 14 mrj
Show comments