कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदार संघांची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. सन २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत सन २०२३ च्या पोटनिवडणुकीत कसबा विधानसभा मतदार संघात १५ हजार मतदार कमी झाले आहेत, तर चिंचवड विधानसभा मतदार संघात तब्बल ४८ हजार मतदार वाढले आहेत. जिल्हा निवडणूक शाखेने दिलेल्या माहितीवरून ही बाब स्पष्ट झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- अपायकारक मेदामुळे दरवर्षी जगातील पाच अब्ज नागरिकांना हृदयविकार; जागतिक आरोग्य संघटनेने अहवाल प्रकाशित

कसबा विधानसभा मतदार संघाच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या दोन्ही जागांची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. ३१ जानेवारीपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. २६ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. कसब्यात कमी झालेल्या आणि चिंचवडमध्ये वाढलेल्या मतदारांचा कोणत्या पक्षाला फायदा किंवा तोटा होणार ही बाब निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.

हेही वाचा- बारावीच्या परीक्षेची प्रवेशपत्रे २७ जानेवारीपासून उपलब्ध

ईव्हीएम तपासणीसाठी दिल्लीहून पथक दाखल

सन २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत कसबा विधानसभा मतदार संघात एक लाख ४४ हजार १२४ पुरुष मतदार होते. एक लाख ४६ हजार ५५२ महिला मतदारांची नावे यादीत होती, तर केवळ चार तृतीयपंथी मतदार होते. जिल्हा निवडणूक शाखेने ५ जानेवारी रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली आहे. हीच यादी या दोन्ही मतदार संघांच्या पोटनिवडणुकीसाठी वापरली जाणार आहे. त्यानुसार कसब्यात १५ हजार २५५ मतदारांची संख्या घटली असून, त्यात ७२५४ पुरुष मतदार, ८००२ महिला मतदार घटले आहेत. त्यामुळे आता कसब्यात पुरुष मतदार एक लाख ३६ हजार ८७३, महिला एक लाख ३८ हजार ५५० मतदार आहेत. तर पाच तृतीयपंथीय मतदार आहेत.

हेही वाचा- “महिलांना मंत्रिमंडळात स्थान देणार”, फडणवीसांची प्रतिक्रिया; पोटनिवडणुकीवर म्हणाले, “बिनविरोध होण्यासाठी महाविकास..”

चिंचवड विधानसभा मतदार संघात सन २०१९ मध्ये पाच लाख १८ हजार ३०९ मतदार होते. अंतिम मतदार यादीनुसार ४८ हजार १०६ मतदार वाढले आहेत. त्यात पुरुष मतदार २५ हजार ३४४ असून, महिला मतदारांमध्येही २२ हजार ७५९ इतकी वाढ झाली आहे. तृतीय पंथीय मतदार केवळ तीन वाढले असून या मतदारांची संख्या ३५ झाली आहे. या मतदारसंघातील एकूण मतदारांची संख्या पाच लाख ६६ हजार ४१५ मतदार झाली आहे, अशी माहिती जिल्हा निवडणूक शाखेच्या तहसीलदार रूपाली रेडेकर यांनी दिली.

हेही वाचा– पुणे : कसब्यात राष्ट्रवादीचा सावध पवित्रा, महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढण्याचे निश्चित

कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघांसाठी पोटनिवडणूक जाहीर झाल्याने भुसावळ येथून १७२० मतदान यंत्रे (इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मिशन – ईव्हीएम) दाखल झाली आहेत. ही मतदान यंत्रे भोसरी येथील गोदामात ठेवण्यात आली असून या यंत्रांच्या तांत्रिक तपासणीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांचे पथक पुण्यात दाखल झाले आहे. या अधिकाऱ्यांकडून मतदान यंत्रांची तपासणी करण्यात येत असून राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना देखील पाचारण करण्यात आले आहे, असेही तहसीलदार रेडेकर यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The number of voters in kasba constituency has decreased by 15 thousand in three years pune print news psg 17 dpj