एकीकडे पुस्तकांची विक्री होत नाही, लेखकांना वेळच्यावेळी मानधन मिळत नाही अशी ओरड मराठीमध्ये असताना इंग्रजी साहित्यामध्ये ‘शिवा ट्रायॉलॉजी’ अंतर्गत आलेल्या ‘द ओथ ऑफ वायुपुत्र’ या पुस्तकाची पाच लाख प्रतींची आवृत्ती प्रकाशित झाली आहे. एवढेच नव्हे तर, केवळ चार दिवसांतच सव्वा लाख प्रतींच्या विक्रीचा उच्चांक या पुस्तकाने प्रस्थापित केला आहे. ‘हॅरी पॉटर’ नंतर सर्वाधिक मागणी या पुस्तकाला आहे.
अमिष त्रिपाठी यांच्या ‘शिवा ट्रायॉलॉजी’ मालिकेतील ‘मेलुहा’ आणि ‘सिक्रेट ऑफ नागा’ या पुस्तकांपाठोपाठ ‘द ओथ ऑफ वायुपुत्र’ हे तिसरे पुस्तक २७ फेब्रुवारी रोजी प्रकाशित झाले. चेन्नई येथील वेस्टलँड पब्लिकेशन्सने प्रकाशित केलेल्या या पुस्तकाची वाचक उत्कंठेने वाट पाहत होते. त्यामुळे केवळ एकटय़ा महाराष्ट्रामध्येच या पुस्तकाच्या चार दिवसांत सव्वा लाख प्रतींची विक्री झाली आहे. तर, पुण्यामध्ये या पुस्तकाच्या ५० हजार प्रती वाचकांसाठी उपलब्ध झाल्या आहेत. ऑनलाइन बुकिंगच्या माध्यमातून या पुस्तकाच्या दोन लाख प्रतींची आगाऊ नोंदणी झाली आहे, अशी माहिती इंडिया बुक हाऊसचे शाखा व्यवस्थापक संतोष साळेकर यांनी दिली. अमिष त्रिपाठी यांच्या आगामी पुस्तकासाठी वेस्टलँड पब्लिकेशनने पाच कोटी रुपयांचे मानधन दिले असून या तीनही पुस्तकांवर चित्रपट निर्मितीसाठी करण जोहर यांनी हक्क घेतले असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
‘शिवा ट्रायॉलॉजी’ मालिकेतील ‘मेलुहा’ हे पहिले पुस्तक २०१० मध्ये बाजारात आले. त्यानंतर वर्षभरातच ‘सिक्रेट ऑफ नागा’ हा दुसरा भाग आला. तेव्हापासूनच वाचकांचा तिसऱ्या भागाची उत्सुकता होती. नवे पुस्तक केव्हा येणार अशी विचारणा दररोज किमान ५० वाचक माझ्याकडे करीत असत, अशी माहिती लष्कर परिसरातील सोळंकी बुक स्टॉलचे आनंद सोळंकी यांनी दिली. कंपनीच्या तीन वितरकांकडून प्रत्येकी सहाशे प्रतींची मागणी मी केली होती. केवळ चार दिवसांतच एक हजार प्रतींची विक्री झाली आहे. ऑनलाइन बुकिंगच्या माध्यमातून खरेदी करणाऱ्या वाचकांना मी त्या किमतीमध्ये पुस्तक उपलब्ध करून दिले. वाचकाला पुस्तक उपलब्ध करून देण्याचा आनंद लुटण्यामध्येच मला समाधान लाभले, असेही त्यांनी सांगितले

‘शिवा ट्रायॉलॉजी’चे लेखक अमिष त्रिपाठी यांनी एक मार्च रोजी सोळंकी बुक स्टॉलला भेट दिली. त्यावेळी मी एक हजार पुस्तकांचा डिस्प्ले मांडला होता. अध्र्या तासाच्या भेटीमध्ये येथील वातावरण पाहून ते भारावून गेले. वाचकांशी संवाद साधण्याबरोबरच त्यांनी छायाचित्र घेण्यासाठी परवानगी दिली. एवढेच नव्हे तर, हे फोटो ‘फेसबुक’वर ठेवण्यासाठी पाठवा, अशी विनंती त्यांनी केली असल्याचे आनंद सोळंकी यांनी सांगितले.