पुणे : पुणेरी मेट्रोच्या हिंजवडी-शिवाजीनगर मार्गाचे मागील महिन्यापासून बंद असलेले काम लवकरच सुरू होणार आहे. वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी गणेशखिंड रस्त्यावर बॅरिकेडिंगला परवानगी दिल्याने मेट्रोच्या कामातील अडथळा अखेर दूर झाला आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) कृषी महाविद्यालय चौकातील रस्ता दुरुस्त करून मेट्रोचे काम दोन ते तीन दिवसांत सुरू केले जाणार आहे.
मेट्रोच्या कामासाठी कृषी महाविद्यालय चौकात बॅरिकेडिंगसाठी पीएमआरडीएने वाहतूक पोलिसांकडे परवानगी मागितली होती. जून महिन्यात पुण्यात जी-२० कार्यगटाच्या दोन बैठका झाल्या. याचबरोबर पालखी सोहळाही पुण्यातून पुढे गेला. यामुळे मेट्रोच्या कामासाठी बॅरिकेडिंगला परवानगी देण्यात आली नव्हती. त्यानंतरही वाहतूक पोलिसांनी बॅरिकेडिंगला परवानगी न दिल्याने गणेशखिंड रस्त्यावर मेट्रोचे काम बंद होते. आता बॅरिकेडिंगची परवानगी वाहतूक पोलिसांनी दिल्याने काम सुरू होणार आहे.
हेही वाचा >>> पंतप्रधानांना लोकमान्य टिळक पुरस्कार देण्यास पुणे शहर काँग्रेसचा विरोध
वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी गणेशखिंड रस्त्यावर मेट्रोच्या कामाची पाहणी केली. कृषी महाविद्यालय चौकात मेट्रोच्या कामामुळे केवळ तीन मीटर रस्ता वाहतुकीसाठी खुला राहणार आहे. त्यामुळे या चौकातील रस्त्यावरील चेंबर समतल पातळीवर आणून आणि रस्ता दुरुस्त करण्याची सूचना त्यांनी केली. चौकातील वाहतुकीस अडथळा येऊ न देता काम सुरू करावे, असे मगर यांनी पीएमआरडीएच्या अधिकाऱ्यांना सांगितले. त्यानुसार कार्य़वाही करून दोन ते तीन दिवसांत मेट्रोचे काम सुरू होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.
हेही वाचा >>> रुपाली चाकणकर यांच्याविषयी समाजमाध्यमात अश्लील मजकूर; सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
काम पूर्ण होण्यास १० ते १५ दिवसांचा विलंब
हिंजवडी ते शिवाजीनगर हा मेट्रो मार्ग २३ किलोमीटरचा आहे. याच मार्गावर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक ते ई-स्क्वेअर या दरम्यान दुमजली उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. या पुलाची लांबी १.७ किलोमीटर असणार आहे. हा उड्डाणपूल मेट्रोच्या कामाचा भाग असणार आहे. बॅरिकेडिंगला परवानगी नसल्याने मेट्रोचे काम जून महिन्यापासून रखडले असून, त्यामुळे काम पूर्ण होण्याच्या कालावधीवर १० ते १५ दिवसांचा परिणाम होऊ शकतो, असे सूत्रांनी स्पष्ट केले.
कृषी महाविद्यालय चौकात मेट्रोच्या कामासाठी बॅरिकेडिंगला वाहतूक पोलीस उपायुक्तांनी परवानगी दिलेली आहे. बॅरिकेडिंग करून लवकरच हे काम सुरू होईल. वाहतुकीस फारसा अडथळा येऊ न देता हे काम केले जाईल. – आर. एल. ठाणगे, कार्यकारी अभियंता, पीएमआरडीए