लोणावळा शहरात गेल्या २४ तासांत १९२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून आत्तापर्यंत ३ हजार २९९ मिलिमीटर एवढा पाऊस झाला आहे. जो गेल्यावर्षीच्या तुलनेत कमी आहे. गेल्या काही दिवसांपासून लोणावळा शहरासह परिसरात संततधार तर कधी दमदार पाऊस कोसळत आहे.

लोणावळा शहर हे प्रसिद्ध गिरीस्थान आणि पर्यटनस्थळ आहे. गेल्यावर्षी याचवेळी ५ हजार ११० मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. तर, यावर्षी केवळ ३ हजार २९९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून गेल्या वर्षीच्या तुनलेत कमी असल्याचे आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे. दरम्यान, २४ तासांत लोणावळा शहर आणि परिसरात १९२ मिलिमीटर पाऊस कोसळला आहे. यामुळे परिसरातील भातशेती करणारे शेतकरी सुखावले आहेत.

पिंपरी-चिंचवडला पाणी पुरवठा करणारं पवना धरण ८२ टक्के भरलं

पिंपरी-चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पवना धरणात ८२.४२ टक्के भरले असून गेल्या २४ तासात पवना धरण पाणलोट क्षेत्रात ८२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी आजतागायत पवना धरण हे १०० टक्के भरलेलं होतं. मात्र, यावर्षी मावळ परिसरात पाऊस कमी असल्याने धरण भरण्यास उशीर होत आहे. परंतु, असाच ऑगस्टच्या ३१ तारखेपर्यंत पाऊस सुरू राहिल्यास धरण शंभर टक्के भरेल यात काही शंका नाही.

Story img Loader