दहशत माजविण्यासाठी पिस्तुल बाळगणाऱ्या सराईतांना कोंढवा पोलिसांनी पकडले. त्यांच्याकडून दोन पिस्तुल तसेच सात काडतुसे असा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला.
सचिन संभाजी जाधव (वय ३१, सध्या रा. म्हाळुंगे इंगळे, ता. खेड, जि. पुणे, मूळ रा. शेजाळे, ता. फलटण, जि. सातारा), सागर काळुराम वायकर (वय २४, रा. पिसर्वे, ता. पुरंदर, जि. पुणे) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. कोंढवा परिसरातील टिळेकरनगर परिसरात पोलिसांचे पथक गस्त घालत होते. त्या वेळी एकजण पिस्तुल घेऊन थांबल्याची माहिती पोलीस कर्मचारी गणेश चिंचकर, अमोल हिरवे यांना मिळाली. पोलिसांच्या पथकाने सापळा लावून जाधवला पकडले. त्याच्याकडून एक पिस्तुल आणि पाच काडतुसे जप्त करण्यात आली. जाधवची चौकशी करण्यात आली.
तेव्हा त्याने साथीदार वायकर याच्याकडे पिस्तुल ठेवण्यासाठी दिल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून पिस्तुल आणि दोन काडतुसे जप्त करण्यात आली. कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील, सहायक निरीक्षक अनिल सुरवसे, अमोल हिरवे, गणेश चिंचकर, अभिजीत रत्नपारखी, महेश राठोड, जयदेव भोसले, राहुल रासगे, दीपक जडे, सुहास मोरे आदींनी ही कारवाई केली.