पुणे : गेल्या दोन दिवसांपासून पुणे शहर आणि परिसरात निर्माण झालेला सुखद गारवा आणखी दोन ते तीन दिवस राहणार आहे. त्यानंतर दक्षिणेकडून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यामुळे रात्रीच्या तापमानात वाढ होऊन थंडी कमी होण्याची शक्यता हवामानतज्ज्ञांकडून वर्तवण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांत शहरातील हवामानात सातत्याने बदल झाले आहेत. दिवाळीनंतर थंडी पडण्यास सुरुवात झाली. सातत्याने दिवसा आणि रात्रीच्या तापमानात घट होत राहिली. त्यामुळे शहरातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए), शिवाजीनगर अशा काही ठिकाणी किमान तापमान एक आकडी नोंदवले गेले. दिवसा हुडहुडी भरण्याइतका गारवा निर्माण झाला होता. मात्र, त्यानंतर बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या ‘फेंगल’ चक्रीवादळाने या थंडीचा प्रभाव कमी केला. हवेतील बाष्पाचे प्रमाण वाढल्यामुळे कमाल आणि किमान तापमानात वाढ झाली. त्यामुळे ऐन हिवाळ्यात उकाडाही सहन करावा लागला. त्यानंतर आता पुन्हा गारवा निर्माण झाला आहे. हवामान विभागाच्या नोंदीनुसार, मंगळवारी किमान तापमान पाषाण येथे १२.२ अंश सेल्सिअस, शिवाजीनगर येथे १२.३, एनडीए येथे १४.६, कोरेगाव पार्क येथे १६.८ अंश सेल्सिअस नोंदवले गेले.
हेही वाचा…एसटी भरधाव ! महिला सन्मान याेजनेतून किती केली कमाई ?
हवामानशास्त्रज्ञ एस. डी. सानप यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याच्या प्रभावामुळे १३ डिसेंबरपर्यंत गारवा राहणार आहे. त्यानंतर दक्षिणेकडून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यामुळे रात्रीचे तापमान वाढण्याचा अंदाज आहे. त्यामुळे थंडी थोडी कमी होऊ शकते. हा बदल फार टिकण्याची शक्यता नाही. त्यानंतर पुन्हा थंडी वाढू शकते.