लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे: स्वारगेट आणि मार्केट यार्ड परिसरातून मुळशी तालुक्यात जाणारे अकरा दहा मार्ग गुरुवारपासून पूर्ववत करण्याचा निर्णय पीएमपी प्रशासनाने घेतला आहे. ही सेवा पूर्ववत करण्यात आल्याने मुळशी तालुक्यातील शेतकरी, विद्यार्थी आणि नोकरदार वर्गाला दिलासा मिळाला आहे.

मार्केट यार्डपासून मुळशी तालुक्यातील विविध मार्गांवरील पीएमपीची सेवा बंद करून सर्व गाड्या कोथरूड डेपोमधून सोडण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे मार्केट यार्डात शेतमाल घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांसह अन्य प्रवाशांची गैरसोय होत असून, या गाड्या पूर्ववत कराव्यात, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी काही दिवसांपूर्वी केली होती. त्यानुसार ही सेवा पूर्ववत करण्याचा निर्णय पीएमपी प्रशासनाने घेतला आहे.

हेही वाचा… ससूनमधील रुग्णांच्या रांगा कमी होणार; आता वेळीच उपचार

मार्केट यार्ड-खोटावडे गाव-मुगावडे, मार्केट यार्ड-मालेगाव (शेडाणी फाटा), मार्केट यार्ड-उरावडेगाव (मारणेवाडी), मार्केटयार्ड-खारावडे (लव्हार्डेगाव), स्वारगेट-काशिंगगाव कमान, स्वारगेट-बेलावडे, मार्केट यार्ड-पौडगाव शासकीय वसतिगृह, मार्केट यार्ड-कोळवणगाव, स्वारगेट-भादसगाव, मार्केट यार्ड-भादसगाव आणि मार्केट यार्ड-खांबोली (कातरखडक) या मार्गांवरील सेवा पुन्हा सुरू झाली आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The pmp administration has decided to restore eleven roads due to demand of mp supriya sule pune print news apk 13 dvr