पुणे: भविष्य सांगण्याच्या बहाण्याने तरुणाला कोरेगाव पार्क भागात लुटून पसार झालेल्या जळगावमधील चोरट्यांना पोलिसांनी अटक केली. रवींद्र अशोक काेळी (वय २५), शिव पवन झंवर (वय २३), मनीष राजेंद्र कोळी (वय २३, तिघे रा. जळगाव) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत एका तरुणाने कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आरोपींची समाजमाध्यमातून तरुणाशी ओळख झाली होती. भविष्य सांगण्याची बतावणी त्यांनी तरुणाकडे केली होती. तरुणाला भविष्य सांगण्याच्या बहाण्याने कोरेगाव पार्क परिसरात बोलावून घेतले. शस्त्राचा धाक दाखवून आरोपींनी तरुणाला ऑनलाइन पैसे पाठविण्यास सांगितले. तरुणाने पैसे पाठविल्यानंतर चोरटे मोटारीतून पसार झाले.

हेही वाचा… पुणे : रेल्वे स्थानकावर आता स्वस्तात पाणी! पाच रुपयांत एक लीटर

पोलिसांनी तातडीने तपास सुरु केला. ज्या बँक खात्यात पैसे पाठविण्यात आले होते. बँक खाते जळगावमधील एका बँकेतील असल्याची माहिती पोलिसांना तपासात मिळाली. त्यानंतर पाेलिसांचे पथक जळगावला रवाना झाले. पोलिसांना आरोपी सापडले नाहीत. पोलिसांनी कोरेगाव पार्क परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण तपासासाठी ताब्यात घेतले. आरोपींनी वापरलेल्या मोटारीचा क्रमांक पोलिसांना मिळाला. त्यानंतर आरोपी पुणे स्टेशन परिसरात येणार असल्याची माहिती पोलीस कर्मचारी विशाल गाडे आणि प्रवीण पडवळ यांना मिळाली. पोलिसांच्या पथकाने सापळा लावून आरोपींना ताब्यात घेतले. आरोपींची चौकशी करण्यात आली.

आरोपींनी बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या परिसरात लुटमारीचा एक गुन्हा केल्याचे तपासात उघडकीस आले. पाेलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक आयुक्त संजय सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली कोरेगाव पार्क पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक निलिमा पवार, गुन्हे शाखेचे निरीक्षक चेतन मोरे, उपनिरीक्षक दत्तात्रय लिगाडे, नामदेव खिलारे, विजय सावंत, संदीप जढर, विलास तोगे, अमर क्षीरसागर आदींनी ही कारवाई केली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The police arrested the thieves from jalgaon who robbed a young man in koregaon park area on the pretext of fortune telling pune print news rbk 25 dvr
Show comments