पुणे: कात्रज भागात एका किराणा माल विक्रेत्याने खंडणी न दिल्याने दुकानाची तोडफोड करुन पसार झालेले आरोपींना भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली. पसार झालेले आरोपी दांडिया खेळण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा लावून पकडले.
विनोद बालाजी सोमवंशी (वय २०, रा. दत्तनगर, कात्रज), गोविंद बबन लोखंडे (वय १८, रा. शनीनगर, कात्रज) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. विनोद सोमवंशीने साथीदार भूषण भांडवलकर, जावेद शेख यांना एका किराणा माल दुकानदाराकडून खंडणी घेण्यास सांगितले होते. किराणा माल विक्रेत्याने खंडणी देण्यास नकार दिल्याने सोमवंशी चिडला. त्यानंतर सोमवंशी आणि साथीदार किराणा माल दुकानात शिरले. दुकानाची तोडफोड करुन जीवे मारण्याची धमकी दिली. किराणा माल विक्रेत्याचा पुतण्या आणि मेहुण्याला मारहाण केली. या भागातील वाहनांची तोडफोड करुन दहशत माजविली.
हेही वाचा… अजित पवारांचा गणेश मंडळांना इशारा, म्हणाले, ‘ध्वनिवर्धकाच्या आवाजाबाबत कठोर कायदा…’
घाबरलेल्या दुकानदाराने पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी पसार झालेल्या सोमवंशी आणि साथीदारांचा शोध सुरू केला. सोमवंशी आणि साथीदार लोखंडे कात्रज-कोंढवा रस्त्यावरील नवरात्रोत्सवात दांडिया खेळण्यासाठी येणार असल्याची माहिती भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या तपास पथकातील पोलीस कर्मचारी हर्षल शिंदे, धनाजी धोत्रे, सचिन गाडे यांना मिळाली. सापळा लावून दोघांना पोलिसांनी पकडले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजय पुराणिक, गिरीश दिघावकर, सहायक निरीक्षक अमोल रसाळ, उपनिरीक्षक धीरज गुप्ता, मोहन कळमकर, हर्षल शिंदे, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, सचिन सरपाले आदींनी ही कारवाई केली.