पिंपरी: पोलिसांनी ‘एक दिवस शाळेसाठी’ हा उपक्रम हाती घेतला असून शाळेत जाऊन सायबर गुन्हेगारी, समाजमाध्यम, व्यसनाधिनता, महिला सन्मान अशा विविध विषयांवर धडे दिले जात आहेत. या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शहरातील बालगुन्हेगारी पोलिसांसमोरची मोठी समस्या आहे. बालगुन्हेगारांना कायद्याचे मोठे कवच आहे. त्यांच्यावर इतर गुन्हेगारांप्रमाणे कारवाई करता येत नसल्याने पोलीस यंत्रणा हतबल ठरत असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर ‘बालगुन्हेगारी’ ही समस्या मुळासकट संपवण्यासाठी पावले उचलण्यास पोलिसांनी सुरुवात केली. मागील काही महिन्यांपासून पोलीस झोपडपट्टीमध्ये जाऊन भरकटलेल्या मुलांचे समुपदेशन करू लागले आहेत. दिशा फाउंडेशनच्या वतीने झोपडपट्टीतील अल्पवयीन गुन्हेगारांसाठी रोजगार निर्मिती करण्याचे काम सुरु आहे. यातून वाम मार्गाला लागलेली मुले मुख्य प्रवाहात येतील, अशी अपेक्षा पोलिसांना आहे.

हेही वाचा… ‘ससून’चे लाखो रुपये बुडाले! रुग्णालय प्रशासनाने घेतली पोलिसांकडे धाव

मुले ‘भाईगिरी’कडे वळू लागल्याने पोलिसांनी मुलांना शाळेत असतानाच कायद्याचे ज्ञान, संस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पोलीस शाळेत जाऊन वर्ग भरवित आहेत. प्रत्येक उपविभागात एक याप्रमाणे १४ उपविभागांची पथके, वाहतूक शाखेच्या मुख्यालयातील खटला, नियोजन विभाग आणि प्रशासनाची तीन पथके, एक सहायक पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त आणि वाहतूक यांचे प्रत्येकी एक पथक याप्रमाणे २० पथके तयार करण्यात आली आहेत. या चमूच्या मदतीला काही कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकारीकडे सर्व जबाबदारी सोपवण्यात आली असून, दर गुरुवारी हा उपक्रम राबविला जात आहे.

विद्यार्थ्यांच्या समस्येसाठी १५ मिनिटे

शाळा आणि पथक प्रमुखांचा एक ‘व्हॉट्सॲप ग्रुप’ तयार करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केल्यानंतर त्यांच्या समस्यादेखील जाणून घेतल्या जातात. त्यासाठी स्वतंत्र १५ मिनिटांचे सत्र आयोजित करण्यात येते. सत्रानंतर विद्यार्थिनी आपल्या समस्या पोलीस अधिकाऱ्यांना खासगीत सांगू शकणार आहेत.

उपक्रमाचा अहवाल त्याच दिवशी

‘एक दिवस शाळेसाठी’ या उपक्रमाचा अहवाल त्याच दिवशी मागवण्यात आला आहे. उपायुक्त दर्जाचे अधिकारी अहवाल तपासणी करत असून अहवालासोबत वर्ग सुरु असतानाचे दोन छायाचित्रेही द्यावे लागत आहेत. त्यामुळे केवळ शाळेला भेट देऊन वेळ मारून नेता येत नाही.

एक दिवस शाळा उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. १३ हजार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलो आहेत. विद्यार्थ्यांना पुस्तकेही वाटप करणार आहोत. – बापू बांगर, पोलीस उपायुक्त

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The police has taken up this initiative one day for school lessons on cyber crime social media addiction womens dignity pimpri pune print news ggy 03 dvr