पुणे: मोटारीचा धक्का लागल्याने झालेल्या वादातून मोटारचालक तरुणाचा खून करणाऱ्या चौघांना पोलिसांनी अटक केली. हडपसर भागातील शेवाळवाडी परिसरात मंगळवारी रात्री ही घटना घडली होती.
अभिषेक संजय भोसले (वय ३०, रा. शेवाळवाडी, मांजरी, पुणे-सोलापूर रस्ता) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी कैलास सकट, सचिन सकट, प्रशांत राखपसरे आणि ज्ञानेश्वर राखपसरे यांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी सात ते आठजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अभिषेक याचा भाचा अथर्व दादासाहेब साबळे (वय १८, रा. ऑर्चिड रेसिडन्सी, शेवाळवाडी, मांजरी) याने फिर्याद दिली आहे.
हेही वाचा… राज्यातील शाळांनी शिक्षकांची छायाचित्रे वर्गात लावली का?
आरोपी आणि मोटारचालक अभिषेक यांची ओळख होती. अभिषेक आणि त्याचा भाचा अथर्व मोटारीतून फुरसुंगी-चंदवाडी रस्त्यावरून मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास निघाले होते. त्यावेळी आरोपींमध्ये भांडणे सुरू होती. मोटारीचा धक्का लागल्याने आरोपींनी शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर टोळक्याने अभिषेकला बेदम मारहाण केली. त्याच्यावर शस्त्राने वार करुन डोक्यात दगड घालण्यात आला. अथर्वला शिवीगाळ करुन टोळक्याने मारहाण केली होती. गंभीर जखमी झालेल्या अभिषेकचा मृत्यू झाला. त्यानंतर पोलिसांनी तपास करुन चाैघांना अटक करण्यात आली.
अभिषेकचा खून प्रकरणी कठोर कारवाईची मागणी
अभिषेक फर्निचर विक्री व्यवसाय होता. घरातील एका खोलीत त्याने व्यवसाय सुरू केला होता. गेल्या वर्षी अभिषेकच्या वडिलांचे अपघाती मत्यू झाला होता. ते सीरम इन्स्टिट्यूटमध्ये कामाला होते होते. अभिषेक विवाहित होता. त्याच्यामागे आई, पत्नी, चार महिन्यांचा मुलगा, तीन बहिणी असा परिवार आहे. अभिषेकचा खून करणाऱ्या आरोपींविरुद्ध कठोर कारवाईची मागणी कुटुंबीयांनी केली आहे.