पुणे : शहर परिसरात मद्यपी वाहनचालकांच्या बेदरकारपणामुळे गंभीर स्वरूपाच्या अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. कल्याणीनगर अपघात प्रकरणानंतर पोलिसांनी मद्यपी वाहनचालकांविरुद्ध कारवाई (ड्रंक अँड ड्राइव्ह) तीव्र केली आहे. पोलिसांनी गेल्या दीड महिन्यात आतापर्यंत १६८४ मद्यपी चालकांविरुद्ध कारवाई केली असून, त्यांचे वाहन परवाने तीन महिन्यांसाठी निलंबित करण्यात येणार आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कल्याणीनगर भागात १९ मे रोजी भरधाव मोटारीच्या धडकेत दुचाकीस्वार संगणक अभियंता तरुण-तरुणीचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवालचा मुलाला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध कारवाई केली होती. रविवारी मध्यरात्री मुंबई-पुणे रस्त्यावर गस्त घालणाऱ्या पोलीस हवालदाराला मद्यपी मोटारचालकाने चिरडल्याची घटना घडली. या अपघातात दुचाकीस्वार पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाला होता. कल्याणीनगर अपघात प्रकरणानंतर पोलिसांनी मद्यपी वाहनचालकांविरुद्ध कारवाई तीव्र केली. मद्य पिऊन वाहन चालविल्यास संबंधित वाहनचालकाचा परवाना तीन महिन्यांसाठी निलंबित केला जाणार आहे. तात्पुरता परवाना निलंबित केल्यानंतर पुन्हा मद्य पिऊन वाहन चालविल्याचे आढळून आल्यास परवाना कायमस्वरूपी रद्द केला जाणार आहे. त्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाची मदत घेतली जाणार आहे, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त रोहिदास पवार यांनी दिली.

हेही वाचा – पुणे : अल्पवयीनाकडून मद्याच्या नशेत वाहनांची तोडफोड, महर्षीनगर भागातील घटना

पोलिसांकडून कारवाई तीव्र

शहर परिसरात वाहतूक नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध कारवाई तीव्र करण्यात आली आहे. नाकाबंदी करून वाहनचालकांची तपासणी करण्यात येत आहे. २१ मे ते ८ जुलै या कालावधीत एक लाख ५८ हजार २६९ बेशिस्त वाहनचालकांविरुद्ध कारवाई करण्यात आली. या कारवाईत १२ कोटी २१ लाख ९३ हजार ५५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. मद्य पिऊन वाहन चालविणे, वाहन भरधाव चालविणे, क्रमांक नसलेले वाहन चालविणे, ट्रिपल सीट, विरुद्ध दिशेने जाणे अशा प्रकारचा नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.

हेही वाचा – पोलीस दलात दहा ‘आयबाइक’ दाखल, गुन्हा घडताच तातडीने घटनास्थळी जाऊन पुरावे संकलित होणार

शहरात मद्यपी वाहनचालकांविरुद्ध कारवाई तीव्र करण्यात आली आहे. एक जानेवारी ते ३० जून या कालावधीत १६८४ मद्यपी वाहनचालकांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. त्यांचे परवाने तीन महिन्यांसाठी निलंबित करण्याचा प्रस्ताव प्रादेशिक परिवहन विभागाकडे पाठविण्यात आला आहे. परवाना निलंबित केल्यानंतर पुन्हा मद्य पिऊन वाहन चालविताना चालक आढळून आल्यास परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात येणार आहे. – रोहिदास पवार, पोलीस उपायुक्त, वाहतूक शाखा

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The police have taken action against 1684 drunk drivers so far in the last one and a half months pune print news rbk 25 ssb