पिंपरी-चिंचवडमधील थेरगाव येथे कोयत्यासोबत रिल्स बनवून इंस्टाग्रामवर स्टेट्स ठेवणं दोघांना चांगलंच महागात पडले आहे. शस्त्र विरोधी पथकाने कठोर कारवाई करत या दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. समर्थ भारत पाटील वय- १९आणि शुभम अभिमान जाधव वय- २१ अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नाव आहेत. अशा प्रकारे घातक शस्त्र घेऊन रिल्स, व्हिडिओ बनवल्यास संबंधित व्यक्तींवर कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी लोकसत्ता ऑनलाइनशी बोलताना दिला आहे. अशा व्हिडिओ पासून तरुणांनी दूर राहावे अस आवाहन त्यांनी केले आहे.
हेही वाचा : विवाहबाह्य संबंध ठेवणाऱ्या महिलेच्या जाचाला कंटाळून प्रियकराची आत्महत्या
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समर्थ आणि शुभम या दोघांनी हातात कोयता घेऊन इंस्टाग्रामसाठी रिल्स बनवले होते. दोघे सोशल मीडियाचा वापर करून दहशत पसरविण्याचा प्रयत्न करत होते. त्या अगोदरच शस्त्र विरोधी पथकाने त्यांना बेड्या ठोकल्या आहेत. दोघे तरुण हे गुन्हेगारी वृत्तीच्या व्यक्तींची इंस्टाग्रामवर प्रोफाइल फॉलो करत असल्याचे तपासात पुढे आले आहे. दरम्यान, अशा गोष्टींपासून तरुणांनी लांब राहावं जर असे काही व्हिडिओ आढळल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी दिला आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील आठशे पेक्षा अधिक गुन्हेगारांच्या इंस्टाग्राम प्रोफाइलवर शस्त्र विरोधी पथकाचे लक्ष असून तातडीने कारवाई करण्यात येईल अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक अंबरीश देशमुख यांनी दिली आहे.