पुणे: बांधकाम व्यावसायिकाने दिलेली २२ लाख ६५ हजार रुपयांची रोकड नीलायम चित्रपटागृहाजवळ धमकावून लुटण्यात आल्याचा बनाव करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाच्या मोटारचालकाला पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून २२ लाख ६५ हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. रोकड लुटीचा बनाव करणाऱ्या चालकाने रोकड लुटीचा बनाव रचला होता. पोलिसांनी खाक्या दाखविताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
बसप्पा वाल्मिक शिंगरे असे अटक केलेल्या मोटारचालकाचे नाव आहे. याबाबत एका बांधकाम व्यावसायिकाने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. बांधकाम व्यावसायिकाने मोटारचालक बसप्पा याला २२ लाख ६५ हजार रुपयांची रोकड कार्यालयात जमा करण्यासाठी दिली होती. मोठी रक्कम पाहून बसप्पाने रोकड लुटीचा कट रचला. निलायम चित्रपटागृहाजवळ चोरट्यांनी धमकावून रोकड लुटल्याची माहिती त्याने बांधकाम व्यावसायिकाला दिली. या प्रकरणी बांधकाम व्यावसायिकाने दत्तवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.
हेही वाचा >>>मंत्रीमंडळ विस्तार अधिवेशनापूर्वी…जागावाटपाबाबत दीपक केसरकर काय म्हणाले?
दत्तवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजय खोमणे यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने तपास सुुरू करण्यात आला. बांधकाम व्यावसायिक विधी महाविद्यालय रस्त्यावर राहायला आहे. विधी महाविद्यालय, शनिवार पेठ, नीलायम चित्रपटगृह परिसरातील १०० ठिकाणचे सीसीटीव्ही चित्रीकरण पोलिसांनी तपासासाठी ताब्यात घेतले. तांत्रिक पडताळणीत रोकड लुटीचा प्रकार आढळून आला नाही. बांधकाम व्यावसायिकाकडील मोटारचालक बसप्पा याची पोलिसांनी चौकशी केली. तेव्हा त्याने दिलेल्या माहितीत विसंगती आढळून आली. पोलिसांनी बसप्पाला खाक्या दाखविताच त्याने रोकड लुटीचा बनाव रचल्याची कबुली दिली.
हेही वाचा >>>पुणे, पिंपरी- चिंचवडमध्ये बंद घराची टेहळणी करून घरफोड्या करणारा सराईत जेरबंद; २० तोळे सोन्याचे दागिने जप्त
पोलीस निरीक्षक पायगुडे, खोमणे, उपनिरीक्षक चंद्रकांत कामठे, हवालदार कुंदन शिंदे, अमित सुर्वे, प्रशांत शिंदे, काशीनाथ कोळेकर, अनुप पंडीत, प्रमोद भोसले, अनिस तांबोळी, पुरुषोत्तम गुन्ला, नवनाथ भोसले आदींनी ही कारवाई केली.