पुणे: अमली पदार्थ तस्कर ललित पाटील प्रकरणाची नि:पक्षपाती चौकशी होण्यासाठी हा तपास केंद्रीय यंत्रणांकडे देणे योग्य आहे. अन्यथा पोलीस बनावट चकमकीत त्याला मारून टाकतील, असा आरोप कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी सोमवारी केला.
ससून सर्वोपचार रुग्णालयातील अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या ललित पाटील याला पोलिसांनी अटक केली आहे. या पार्श्वभूमीवर धंगेकर यांनी पत्रकार परिषदेत हा आरोप केला. या प्रकरणाचा तपास केंद्रीय यंत्रणांकडे देण्याचा पुनरूच्चारही त्यांनी केला. ते म्हणाले की, ससून रुग्णालयातील एक शिपाई हा आरोपी ललित पाटील आणि एका मंत्र्यामधील दुवा होता. त्यामुळे या प्रकारची चौकशी झाली पाहिजे.
हेही वाचा… पिंपरीतील व्यावसायिक इमारतींचे होणार सर्वेक्षण, अग्नी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची तपासणी
आरोपी पाटील याची पंचतारांकित हाॅटेलमध्ये बडदास्त ठेवली जात होती. ललित ससूनमधून अमली पदार्थांची विक्री करत होता. पोलिसांची साथ असल्याने हा प्रकार झाल्याने केंद्रीय यंत्रणेमार्फत त्याचा तपास होणे आवश्यक आहे. या प्रकरणात सरकारमधील तीन मंत्र्यांचा समावेश असल्याची चर्चा असून, तपासाची दिशा बदलण्यात आली आहे. या सर्व प्रकारात ससूनचे अधिष्ठाता डाॅ. संजीव ठाकूर यांच्याभोवतीही संशयाची सुई फिरत असून, त्यांच्या दूरध्वनीची तपासणी झाली पाहिजे.