पिंपरी : महापालिका आस्थापनेवरील अभियांत्रिकी विभागाच्या आकृतीबंधानुसार मुख्य अभियंता एक आणि मुख्य अभियंता दोन या पदांना राज्याच्या नगर विकास विभागाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता शहर अभियंता यांच्या समकक्ष दोन पदांची नियुक्ती होणार आहे. दरम्यान, या पदांमुळे शहर अभियंता पदाचे महत्त्व कमी होणार आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका आस्थापनेवरील शहर अभियंता समकक्ष मुख्य अभियंता (प्रकल्प) व मुख्य अभियंता (पर्यावरण) या दोन पदांची नव्या पदनिर्मिती आणि सेवा प्रवेश नियम लागू करण्याबाबत महापालिका सर्वसाधारण सभेत २० सप्टेंबर २०२१ रोजी ठराव मंजूर झाला होता. हा प्रस्ताव मान्यतेसाठी राज्य शासनाकडे पाठवला होता. या प्रस्तावाच्या मान्यतेसाठी आमदार महेश लांडगे यांनी पाठपुरावा केला. नगरविकास विभागाने बुधवारी महापालिकेच्या आस्थापनेवरील शहर अभियंता पदांची वेतनश्रेणी तसेच मुख्य अभियंता पदनिर्मिती, वेतनश्रेणी, प्रमाण अर्हता मंजूर करण्यात आल्याचा आदेश जारी केला.
हेही वाचा – मनमानी कारभार! पुण्यात रेल्वेचे अधिकारी वरिष्ठांना जुमानेनात
शहराची लोकसंख्या सुमारे ३० लाख आहे. आगामी काळात महापालिका हद्दीत समाविष्ट होणारी नवीन गावे आणि शहराचा विस्तार पाहाता अतिरिक्त आयुक्तपदावरील अधिकाऱ्यांवर कामाचा ताण होता. आता दोन मुख्य अभियंता पदाची निर्मिती झाल्यामुळे प्रशासकीय कामकाज सुलभ होईल. विकासकामे आणि प्रकल्पांना चालना देण्याबाबत सोईचे होणार आहे.